बुटीबोरी -वर्धा महामार्गावर असलेल्या बुटीबोरी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील गाडबुकीं मंदिराला गेली ५० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे.नागपूर येथील शेषराव बाळबुधे नामक भाविकाने येथील निसर्गरम्य अशा टेकडीवर जमिनीपासून जवळपास ३०० फूट उंचीवर छोट्याशा शिवमंदिराची स्थापना केली होती असे सांगण्यात येते.
त्यानंतर आसोला येथील रहिवासी शिवभावीक विजय गहरुले यांनी या पावन स्थानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली.भाविकांसाठी हे ठिकाण नंदनवन ठरत असल्याने याकडे लक्ष देत स्थानिक पातळीवर भाविकांची गर्दी खेचण्यात यश प्राप्त केले आहे.येथील प्राचीन स्वयंभू शंकर मंदिर हा एक अनमोल ठेवा आहे निसर्गाच्या सान्निध्यात उच्च डोंगर , डेरेदार वनराई हे मंदिर परिसराचे वैशिष्ट्य असल्याने
महाशिवरात्री,श्रावण आणि नवरात्री च्या तिथीला या ठिकाणी प्रचंड जनसागर उसळतो. तालुक्यातील असंख्य भाविक महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात.
मागील दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले असल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला होता.यंदा शासनाने निर्बंधात थोडीफार शिथिलता दिली असल्यामुळे या मंदिरात भाविकांचा सागर बघायला मिळाला.बुटीबोरीचे ठाणेदार भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात बुटीबोरी पोलीस ठाण्याचे रामा आडे,असलम नौरंगाबादे,रमेश काकड,विनायक सातव,कुणाल पारधी आदींनी चोख बंदोबस्तात परिसरात नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळली