
Butibori आपल्या भारत भूमीत गुरू-शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शिष्य अध्ययनाकरीता गुरूजवळ येतो आणि गुरू शिष्याला अध्ययनासोबतच जीवनाच्या वाटचालीबद्दल शिक्षण देऊन शिष्याला घडवतो. एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवून अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवतो.

या गुरूला काही अंशी उतराई होण्याची संधी शिष्याला मिळावी हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे व नागपूर जिल्हापरिषद सदस्य वृंदा नागपुरे यांच्या नेतृत्वात १२ ते १४ जुलै असे तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन बोरखेडी फाटक येथे गुरू पौर्णिमा उत्सव समितीद्वारे करण्यात करण्यात आले आहे.

साई पार्क येथे आयोजित या गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात १२ जुलैला सकाळी ६ वाजता श्रींच्या मंगल स्नानाने करण्यातयेईल. त्यानंतर मध्यान्ह आरती, भजन, कीर्तन, धूप आरती करण्यात येईल. १३ जुलैला संपूर्ण गावभर श्रींची रथयात्रा काढण्यात येईल. १४ जुलैला सत्यनारायण व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रकाश नागपुरे यांनी दिली.

विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला वनराईचे गिरीश गांधी, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी मंत्री सुनील केदार उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आपल्या गुरुबद्दल कृतघ्नता व्यक्त करण्याकरिता जास्तीतजास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अमेय व भाग्यश्री नागपुरे यांनी केले आहे.
