दुचाकी ट्रकवर आदळली, चालकाचा मृत्यू

एक जण जखमी : बोरखेडी शिवारातील घटना

घटनास्थळी उपाययोजनांचा अभाव

■ ट्रकचालकाने त्याचा ट्रक रोडलगत उभा करतेवेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. ट्रकच्या तुलनेत दुचाकीची उंची फारच कमी असते.
■ त्यामुळे दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर असलेली उंच व मोठी वाहने सहसा व्यवस्थित दिसत नाही.
■ चालकाने ट्रकचे इंडिकेटर जरी सुरू ठेवले असते, तरी दुचाकीचालक रवींद्र खुरसंगे याला ते लांबून दिसले असते व अपघात टळला असता.

बुटीबोरी: दुचाकीचालकाला रात्रीच्या अंधारात समोर रस्त्यालगत उभा असलेला ट्रक व्यवस्थित दिसला नाही. त्यामुळे वेगात असलेली दुचाकी त्या ट्रकच्या मागच्या भागावर आदळली.. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण ) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरखेडी शिवारात शुक्रवारी (दि. २४) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.


रवींद्र खुरसंगे असे मृताचे, तर कपिल ऊर्फ आशिष ज्योतीराम ढोके (२७, रा. बोरखेडी रेल्वे, ता. नागपूर ग्रामीण) असे जखमीचे नाव आहे. दोघेही शुक्रवारी रात्री दुचाकी (एमएच-४०/एडी-५८८०) ने बुटीबोरीहून बोरखेडी (रेल्वे) येथे जात होते. दरम्यान, बोरखेडी शिवारातील टोल नाक्याजवळ दुचाकीचालक रवींद्र खुरसंगे याला समोर रस्त्यालगत उभा असलेला ट्रक दुचाकीच्या हेडलाईटमध्ये व्यवस्थित दिसला नाही. त्यामुळे त्याची वेगात असलेली दुचाकी थेट ट्रक (एमएच-४०/एके- ५६३६) वर मागून जोरात आदळली.

यात दोघेही रस्त्यावर खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. रवींद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून रवींद्रचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर कपिलला उपचारासाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *