‘फोनिक्स’चा पीएम सडक योजनेवर ‘दरोडा’?

स्वतः घेतलेले कंत्राट दिले पेटी कंत्राटात / कमिशनपोटी दुप्पट कमाई

नागपूर संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘कोल स्केम’ प्रमाणे आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कोट्यवधींच्या निधीवर अधिकारी आणि केवळ कागदावर कंत्राटदार असलेल्या कंपन्या संगनमताने दरोडा टाकत आहेत. दरोडाच नव्हे तर संगनमताने योजनेचे लचकेही तोडत आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदार हा निकृष्टतेवर भर देत आहे.

असाच योजनेतील एक घोटाळा नागपूर ग्रामीण तालुक्यात बोरखेडी (रेल्वे)- आलगोंदी – टॅमरी-खड़ ते तामसवाडी – आष्टा राज्य महामार्ग क्र. ५३ येथे उघडकीस आला आहे. सध्याघडीला नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) ते आलगोंदी ते टॅमरी ते खर्डा ते तामसवाडी ते आष्टा राज्य महामार्ग क्र.५३ पर्यंत एकूण १४.३० कि.मी.ग्रामीण रस्ते विकास संस्था,नागपूरद्वारा सुरू आहे.

या १४.३० कि.मी. रस्त्याचे काम फोनिक्स इंजिनिरिंग कंपनीला ६२६.३८ लक्ष रुपयाला दिले आहे. त्यात १३.६७ कि.मी. डांबरी रस्ता, ०.६३० कि.मी. कॉंक्रीट रस्ता व २४ मोठ्या बांधकामाचा समावेश आहे. परंतु फोनिक्स इंजिनिरिंग कंपनीने स्वतः घेतलेला हा कंत्राट श्री ट्रेडिंग अॅण्ड कन्ट्रक्शन कंपनीला पेटी कंत्राटात दिला असल्यामुळे फोनिक्स इंजिनिरिंग कंपनी फक्त कागदी घोडे चालवायचे करोडो रुपयांचे कमिशन खात असल्याचे दिसून येते. वास्तविक कामाची किंमत व पेटी कंत्राट दिल्याची किंमत यात खूप तफावत असल्यामुळे पेटी कंत्राटदार हे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल व धुळीमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विध्यमान पं.स. सदस्य संजय चिकटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन अवगत केले, परंतु कमिशनच्या मलाई हातासह तोंडही भरले असल्यामुळे संबंधित कामाकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने पेटी कंत्राटदाराचे चांगलेच फावते आहे.

रस्ता बांधकामात स्थापत्य तांत्रिक नियमाला तिलांजली

याठिकाणी स्थापत्य नियम आणि तांत्रिक कार्यपद्धतीला तिलांजली देण्यात आली आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्याने उडणारी धूळ, रस्त्याच्या कडेला टाकलेली गिट्टी रस्त्यावर येऊन रस्ता अरुंद झाला तरी कंत्राटदार व अधिकारी यांना काहीही देणे घेणे नाही. विशेष बाब अशी की, संबंधित काम हे १५ डिसेंबर २०२१ पासून सुरू होऊन १४ डिसेंबर २०२२ ला पूर्ण करायचे होते. त्याप्रमाणे या कामाचा कंत्राट फोनिक्स इंजिनिरिंगला देण्यात आला होता. परंतु फोनिक्स इंजिनिरिंगने कंत्राटाचे कागदी घोडे नाचविण्यासाठी व पेटी कंत्राटदार शोधण्यामध्येच टाईम घालवला. त्यामुळे निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही. त्यात काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आहे. परंतु या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता लक्ष देत नसल्याने कागदावरील कंत्राटदार व अधिकारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीवर संगनमताने दरोडा टाकत असल्याचे दिसून येत आहे.

1 thought on “‘फोनिक्स’चा पीएम सडक योजनेवर ‘दरोडा’?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *