‘असुरक्षित’ महिलांसाठी प्रोजेक्ट ‘कवच’ प्रभावी ठरणार

बुटीबोरी : महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यातून त्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने एमआयडीसी बोरी पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी निर्णय घेतला. स्थानिक औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी ठाणेदार अशोक कोळी यांनी पुढाकार घेत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट ‘कवच’ ही मोहीम हाती घेतली. हा उपक्रम अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित महिलांना सुरक्षा देण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखविला आहे.


स्थानिक औद्योगिक क्षेत्रात शेकडो महिला कौटुंबिक जबाबदारीला हातभार म्हणून स्थायी – अस्थायी स्वरूपात कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना परतीच्या वेळी उशीर झाला, तर नाना संकटांना तोंड द्यावे लागते. उशीर झाल्याने घरची स्त्री सुरक्षित पोहोचेल की नाही, ही चिंता असते. आजमितीला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे कामगार महिलांत भीतीचे वातावरण आहे. त्यांच्यात सुरक्षिततेचा विश्वास जागृत करण्यासाठी एमआयडीसी बोरी पोलिसांनी ‘प्रोजेक्ट कवच’ हा उपक्रम हाती घेतला.

एमआयडीसी बोरीमधील सर्वाधिक महिला कामगार असलेल्या मोरारजी टेक्सटाइल आणि इनोव्हेटिव्ह कंपन्यांमध्ये एमआयडीसी butibori ठाणेदारांनी भेट देत त्यांना सुरक्षेचा कानमंत्र दिला. कामावर येताना किंवा घरी परतायला उशीर होत असताना संकट उभे राहिले, तर त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सज्ज आहेत, असा विश्वास कोळी यांनी महिलांना दिला. कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असेल, तर मोठा भाऊ म्हणून माझ्याकडे तक्रार करा, असा सल्ला दिला. तुमचे नाव गुपित ठेवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या उपक्रमामुळे महिला कामगारांना आधार मिळाला आहे, असे महिलांनी सांगितले. यावेळी ठाणेदार कोळी, महिला पोलीस कर्मचारी सुषमा, पूनम व कर्मचारी निखिल उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *