आश्वासन नाही, पण प्रयत्न करेल

मोरारजी कंपनीतील 2 हजार कामगारांना मेघेंची ग्वाही ; 4 महिन्यांपासून कामगारांवर उपासमारीची पाळी

बुटीबोरी,. आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून बुटीबोरी क्षेत्राला स्थान आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत कामगारांचे त्यांच्या व्यवस्थापनासोबत होणारे वाद विकोपाला जाऊन शेकडो कामगारांच्या वैयक्तिक झालेल्या दुर्दैवी परिस्थितीकडे शासन प्रशासनाने पाठ फिरविली असल्याचे भयावह चित्र आहे.

अनेकांच्या रोजगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून त्यांचे परिवार उघड्यावर पडलेले असून देखील कामगार हिताचे कायदे करणाऱ्या प्रशासनाने कसे काय मौन धारण केले आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील एकेकाळी नामी कंपनी म्हणून ओळख असलेली मोरारजी टेक्स्टाईल कंपनी ही गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यात काम करणारे जवळपास 2 हजार कामगार आज बेरोजगारीचा सामना करीत आहेत. अनेक वर्षांपासून या कंपनीत व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात न्यायिक हक्कासाठीचा वाद सुरू होता.

यासाठी येथील कामगारांनी अनेकदा लक्षवेधी आंदोलने देखील केलीत, मात्र त्यांना न्याय मिळू शकला नाही. अखेर हा वाद विकोपाला जाऊन कोणताही तोडगा न काढता व्यवस्थापनाने ही कंपनीच बंद पाडली. आज चार महिने झाले येथील सर्व कामगार रोजगारासाठी वणवण करीत आहेत.

अनेकांच्या घरातील चुली केवळ एकच वेळ पेटत आहेत. एकीकडे कंपनी बंद असल्याने घरात आलेले दारिद्र्य आणि त्यात मुलांच्या शिक्षणाची चिंता ही घरच्या कर्त्याला आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे. आज एका कामगाराच्या भरवश्यावर असलेले कुटुंबातील चार सदस्य असे जवळपास आठ ते दहा हजाराच्या कुटुंब सदस्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याचा बुटीबोरी परिसरातील बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम बघायला मिळत आहे.

मात्र प्रशासनाला याचे काहीही देणंघेणं नसल्याचेच जाणवत आहे. 25 वर्षांपासून कार्यशील असलेली मोरारजी कंपनी ही एका क्षणात बंद पडणे म्हणजे संवेदनशील सरकार म्हणून मिळविणाऱ्या राज्य सरकारला गालबोट लागणे आहे. कंपनी सुरळीत सुरू राहावी यासाठी शासन दरबारी खेटे घालणारे कामगार यांनी आता मोरारजी कंपनी बचाव समिती स्थापन केली. त्यांच्या व्यथेची जाणीव करून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण यांनी त्यांना न्याय मिळावा या उद्देशातून शासन दरबारी मागणी करण्यासाठी नेतृत्व करीत हिंगणा विधानसभा क्षेत्राचे सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार समीर मेघे यांना मोरारजी कंपनी सुरू करून कामगारांच्या चुली पूर्ववत पेटाव्या, अशी मागणी केली. आमदार मेघे यांनी कामगारांच्या भावनेचा आदर करत सहानुभूती दाखविली. लवकरच राज्याचे विद्यमान गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन काही पर्याय काढता येईल काय, याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगत ‘आमच्या प्रयत्नाने कंपनी सुरू होईलच असे आश्वासन देणार नाही, परंतु आम्ही त्यासाठी यथाशक्ती प्रयत्न नक्कीच करणार’ असी ग्वाही दिली. त्यांच्या ग्वाहीतुन 2 हजार कामगार तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक आशेचा किरण नक्कीच दिसू लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *