३५०० रुपये वेतनातून प्रत्येक महिन्याला १००० रुपये गोरगरिबांच्या मदतीसाठी देणारी माऊली

दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणारी कर्मयोगी माऊली..
३५०० रुपये वेतनातून प्रत्येक महिन्याला १००० रुपये गोरगरिबांच्या मदतीसाठी देणारी माऊली
बुटीबोरी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोलार ग्रामच्या सौ. वर्षा शेषराव पारसे. कर्मयोगीं फाऊंडेशन मध्ये कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. माझी आणि ताईची भेट २०१७ मध्ये झाली. पण खऱ्या अर्थाने ताई आमच्या संपर्कात आली ती २०१८ मध्ये, जेव्हा ताईच्या जिद्दीमुळे आम्ही कोलार हे गावं आदर्श निर्मितीसाठी घेतले. ताई कोणत्याही राजकीय पार्टीशी संबंधित नसतांना घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना सुद्धा गावासाठी सारखी राबत होती. ताईच्या सहकार्याने आम्ही गावात अनेक आदर्श ग्राम निर्मितीवर उपक्रम राबविले. त्यावेळी ताई बचत गटांमध्ये सी आर पी या पदावर कार्यरत होत्या त्यांना त्याचे ३००० रुपये मानधन मिळत होते. ताईची गावप्रती व समाजाप्रती काम करण्याची जिद्द पाहून आम्ही त्यांना कर्मयोगीमध्ये कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत केलं. ताईला कर्मयोगीचं काम इतकं आवळू लागलं की त्यांनी आपल्या सी. आर. पी. पदाचा राजीनामा देऊन जास्तीतजास्त कर्मयोगी मध्ये निष्ठेने काम करण्याचं ठरविलं. ताईला दोन मुली आहेत. ताईचे पती मासोळी पकळण्याचे काम करत होते, ताई सुध्दा खाली वेळेत पिशव्या शिवणे, ब्युटीपार्लरच काम करून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आपल्या पतीला मदत करत होत्या.

butibori


२०२० च्या सुरवातीला कोरोना संकट आलं . होत्याचं नव्हतं झालं भाऊंचा मासोळी पकडून विक्री करण्याचा व्यवसाय डबघाईस आला. असेही असतांना ताईंनी या काळात आपल्या पदाला साजेसं काम करत कर्मयोगी मार्फत कोरोना काळात रुग्ण व गरजवंताची सेवा केली . तिही अन्नदानापासून ते कोरोना रुग्णाची राख उचलण्यापर्यंत. या वातावरणात
घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाली. परिस्थितीत बदल व्हावा म्हणून पती पत्नी दोघांनी बुटीबोरी येथें फुल विक्रीची व्यवसाय सुरू केला. तरीही शाळेत मुलींची फी भरण्यासाठी पैसे जमत नव्हते. ताईंचा स्वभाव स्वाभिमानी असल्यामुळे इतर कोणाकडेही हात न पसरवता त्यानी बुटीबोरी येथे एका खाजगी दवाखान्यात ३५०० रुपये मासिक वेतनावर काम करणे सुरू केले. पतीदेव फुल विक्री करत होते त्यासाठी ताई सकाळी ३ वाजता उठतात. घरची सर्व कामे करून बुटीबोरीला येतात., तेथून सकाळी नागपूरला जाऊन फुलांची खरेदी करतात व सकाळी ९ च्या आत पतीदेवांना विक्रीसाठी फुले आणून देतात. नंतर ९ ते ३ दवाखान्यात सेवा देतात.त्यानंतरचा वेळ कर्मयोगी फाऊंडेशनच्या सेवकार्यासाठी देतात.


कर्मयोगी फाऊंडेशनच्या सभासदांनी आपल्या स्वेच्छेने एका दिवसाचा पगार कर्मयोगी मध्ये जमा करावा असं ठरलं आहे.
त्यात काही मोजके लोकं ,एक दिवसाचा पगार जमा करतात. त्यात सर्वात मोठा त्याग म्हणजे ताईंचा घर चालविण्यासाठी एका एका पैशाचं महत्व असताना आपल्या ३५०० या वेतनांपैकी १००० रुपये कर्मयोगी मध्ये जमा करतात म्हणजे जवळपास ९ दिवसाचं वेतन कर्मयोगीं मध्ये जमा करतात व मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यासाठी आपले श्रम सुद्धा देतात. ताईंना मी म्हटलं मला कर्मयोगीं साठी तुमचे पैसे नको, तुम्हालाच तर किती अडचण आहे. त्यावर ताई म्हणाली भाऊ माझ्यापेक्षाही खूप गरीब विधवा ताई आहेत त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी माझा खारीचा वाटा घ्याना भाऊ.

Digital marketing butibori

मला नाईलाजास्तव ताईची पैसे घ्यावे लागतात कारण ताईला त्या विधवा ताईंच्या मुलामुलींत आपली स्वतःची मुले दिसतात खरंच जो दुसऱ्यासाठी जगला त्याला दुसरं पुण्य कमवण्याच काम नाही हे ताईला पूर्णपणे कळून चुकलं आहे. म्हणतात ना की हे ब्रह्मांड कोणाकडूनही दान घेत नाही व कोणाकडूनही सेवा करून घेत नाही. देण्याचं व सेवा करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते पुण्यात्मा असतात. करोडो रुपये असूनही कधी आयुष्यात कोणाच्या मदतीला आले नाही किंवा कोणत्या चांगल्या कार्याला मदत केली नाही त्यांनी या माऊली पासून प्रेरणा घ्यावी की मानव जन्माचं सार्थक काय असते तर ही माऊली जे काम करत आहे ते खरे काम असते. हे ब्रह्मांड कोणाचा एक पैसाही आपल्याकडे ठेवत नाही त्याच्या लाखोपट त्याला परत करते. आज जरी ताईचे दिवस हालाखीचे असले तरी ते उद्या चांगले येतील व ही माऊली आपल्या कर्तृत्वाचा इतिहास नोंदविल्याशिवाय राहणार नाही.
स्वतःचं शरीर झिजवत दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख पाहणाऱ्या या माउलीला माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम.