butibori

कर्मयोगीचे पंकज ठाकरे यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर.

बोलते नव्हे तर कर्ते व्हा हा संदेश देत कार्य करणारे कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड बुटीबोरीचे कामगार पंकज ठाकरे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे देण्यात येणारा २०१९ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाला आहे. २५००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी गेल्या ३० वर्षांपासून या पुरस्काराच्या प्रतीक्षेत होते. ती प्रतीक्षा यावर्षी पूर्ण झाली.
पंकज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भष्ट्राचारा विरुद्ध लढत लढत कर्मयोगी फाऊंडेशनची स्थापना केली व त्या मार्फत श्रमदानातुन आदर्श ग्राम निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले. हे करतानाच त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले, जलसंधारणाची कामे केली, वाचनालयासाठी आर्थिक मदत केली, ग्रामस्वच्छता सप्ताह राबविले, रस्त्याला पडलेले जीवघेणे खड्डे श्रमदानातून बुजविले, लाखो रुपयांची स्पर्धा परीक्षा पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली, गावोगावी आरोग्य शिबीर राबविले, शंभर पेक्षा जास्त लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणल्या, नवरात्रात ५०० विधवा महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांची साडीचोळी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले, बुटीबोरी येथे कामगार कल्याण मंडळ नव्हतें त्या कामगार मंडळाची स्थापना २०१८ मध्ये घडवून आणली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७१ दिवस निरंतर अन्नदान तेही बासुंदी पासून ते पुरणपोळीपर्यंत, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, अनेक मुलींच्या शिक्षणाला आर्थिक मदत, रुग्णांना आर्थिक मदत, स्वच्छतेच्या दूत, धुणीभांडीनविन करणाऱ्या महिलांना साडीचोळी देऊन त्यांची संक्रांत साजरी केली. विधवा महिलांना दिवाळीचा संपूर्ण किराणा तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराला नवीन कपडे, ५१ विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप, ५० गावात आधार काठी वाटप, फुटपाथवर काम करणाऱ्या लोकांना सावलीसाठी १०१ छत्रीचें वाटप तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बुटीबोरी परिसरातील सर्व दवाखान्यात चहा बिस्कीट, नास्ता व जेवणाची निशुल्क सोय, रुग्णांसाठी चारचाकी गाडी उपलब्ध करून दिली, तब्बल ५१३ लोकांना ५२ क्विंटल ३० किलो अन्नधान्याचे वाटप, दोन मोक्षधामची साफसफाई, मोठ्या प्रमाणात मास्क वाटप, कोरोना रुग्णाची राख उचलून तिची योग्य विल्हेवाट लावली, सातगाव मोक्षधामचा संपूर्ण कायापालट, पत्रकार, पोलीस, आरोग्य अधिकारी, विद्यार्थी, संयुक्त कुटुंब पद्धती, आई वडीलांची सेवा करणारी मुले, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात सत्कार घडवून आणले.
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सायकल वाटप व निरंतर गोरगरीब लोकांसाठी कर्मयोगी फाऊंडेशन विविध उपक्रम राबवित या भागात देवदूताप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांना गुणवंत पुरस्कार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने जाहीर करून या पुरस्काराचे मोल वाढविले असे सर्वच स्तरातून बोलल्या जात आहे.
या पुरस्कारा विषयी पंकज ठाकरे याना विचारले असता ते म्हणाले आम्ही गाडगेबाबा यांच्या कृतिशील विचारसरणीवर कार्य करणारे सामान्य लोक आहोत. आम्ही पुरस्काराच्या अपेक्षेने कोणतेच कार्य करत नाही. कामगार कल्याण मंडळ बुटीबोरीचे केंद्र संचालक सुर्धमा खोडे व आमच्या कंपनीचे पर्सनल मॅनेजर र्ज सर यांनी प्रोत्साहित केल्यामुळे मी पुरस्कारासाठी नामांकन भरले व पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झालो. याचे सर्व श्रेय माझी आई जिने आम्हाला यावे ज्ञानासाठी जावे सेवेसाठी, खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सांगत आम्हाला मानवी जीवन सार्थक करण्याची शिकवण दिली. सोबतच आमचा कर्मयोगी परिवार व माझ्या आस्थापनेतील सर्व सहकारी मित्रांना जाते.
मला मिळालेला हा पुरस्कार बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं , कंपनीच्या भरभराटीस्तव प्रसंगी अनेकांची प्राणज्योत मावळली, अनेकांना कायमचं अपंगत्व आलं अशा माझ्या सर्व कामगार बांधवांना माझा हा गुणवंत कामगार पुरस्कार मी विनम्रतापूर्वक समर्पित करत आहोत असे ते म्हणाले.