बुटीबोरीत ब्रह्माकुमारींच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

बुटीबोरी: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बुटीबोरी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित महिलांनी उपस्थिती दर्शवली.

स्थानिक ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी स्मिता बहन यांनी राजयोग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच, ब्रह्माकुमारी शुभांगी दीदी यांनी महिलांना आनंदी राहण्याचे तंत्र, आत्मबल वाढवण्याचे महत्त्व, तसेच संतोषी वृत्तीने संपूर्ण कुटुंबाला संतुष्ट ठेवण्याची कला शिकवली.

यावेळी बोलताना शुभांगी दीदी म्हणाल्या, “प्रत्येक नारी ही देवीचे स्वरूप आहे आणि समाज, कुटुंब व देशासाठी तिच्या सक्षमतेची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.”
कार्यक्रमाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण ब्रह्माकुमारी गौरी दीदी यांनी दिले. कार्यक्रमाचे कुशल संचालन ललिता वर्मा यांनी केले.

या कार्यक्रमात विशेष सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग जलतरणपटू कुमारी ईश्वरी पांडे हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ईश्वरीने आपल्या सुमधुर गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच, कुमारी स्वरा कुटे हिने “देवी महिमा” या विषयावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला डॉ. शेलिका रावत, रीता कुटे, रूपाली टेकाळे, देशमुख मॅडम, नंदा पाटील, डॉ. पुनम जयस्वाल, जेऊर्कर मॅडम आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.
महिला सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.