कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बुटीबोरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुटीबोरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय २, नागपूर यांच्या वतीने कामगार कल्याण केंद्र, बुटीबोरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मा. नंदलाल राठोड (उपकल्याण आयुक्त) व मा. छोटू जाधव (कामगार कल्याण अधिकारी, नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कामगार आणि कामगार कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नाट्यकलावंत व महिला नकलाकार मा. संगीता टेकाडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. स्वाती तांबे (विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ), मा. डॉ. प्रिती चौधरी (एम.बी.बी.एस., एम.डी.), मा. संध्याताई आंबटकर (माजी सभापती, बुटीबोरी), मा. कविता वानखेडे आणि मा. प्रविन नाईकवाडे (एचआर मॅनेजर, स्पेस वूड प्रा. लि.) उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी महिलांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये मा. जुथिका बोडखे (इंडोरामा), मा. प्रिती तम्मीवार (इंडोरामा), अंकिता देशमुख (कॅलरीज इंडिया), मा. आशा सुभे (स्पेस वूड) आणि मा. कामिनी रामटेके (ग्रँडविल प्रा. लि.) यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. छोटू जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संचालन सुधर्मा खोडे (केंद्र संचालक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन रिता कुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश बेलसरे, दिनेश कुटे, धोपटे ताई, सिसट ताई यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सोहळ्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने कामगार महिलांच्या योगदानाला उचित सन्मान मिळाला व त्यांना पुढील कार्यासाठी नवी प्रेरणा मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *