बुटीबोरी : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना हळदगाव येथे विनापरवाना डिझेल व पेट्रोलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी धाड टाकली असता हिरव्या नेटच्या आड पाच मोठ्या कॅन डिझेल इंधनाने भरलेल्या आढळल्या. ही कारवाई शनिवारी (२५ फेब्रुवारी) करण्यात आली.
पोलिसांनी मोहित मनोज कठाणे (२०, रा. कुंभारे कॉलनी, न्यू कामठी) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की,
वर्धा महामार्गावर ये-जा करणाऱ्या ट्रकचालकांकडून तो पेट्रोल, डिझेलची खरेदी करीत होता व आजूबाजूच्या लोकांना विक्री करायचा. आरोपीविरुद्ध भादंविच्या अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व आट (१) पेट्रोलियम अधिनियम १९३४ अन्वये पोलीस ठाणे बुटीबोरी येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पाच मोठ्या कॅनमध्ये १०० लीटर डिझेल, पाच मोठ्या कॅन, डिझेल गाळण्याची चाळणी व एक पाइप जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस मिलिंद नांदूरकर, महेश जाधव, मयूर ढेकले, अमृत किनगे यांनी केली.