वृद्धांना आधार देत कर्मयोगीची आधारकाठी पोहोचली ११४ गावात….
२०२३ मध्ये कर्मयोगी फाऊंडेशनने वृद्ध मंडळींना प्रेमरूपी आधार देण्यासाठी ५१ गावात आधार काठी (कुबळी) वाटपाचा संकल्प केला होता. कर्मयोगी फाऊंडेशनने आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करत त्यांनी ५१ गावात आधार काठी वाटपाचा जो संकल्प २०२३ मध्ये एका वर्षात पूर्ण करण्यासाठी केला होता, तो आपल्या योग्य नियोजनाने व सातत्यपूर्ण कार्याने ६ महिन्यात पूर्ण करत आतापर्यंत आधार काठी वाटप ११४ गावात नेऊन पोहोचविले.
या उपक्रमाची सुरुवात नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी येथुन दि. २७ जून २०२१ रोजी करून पुढे घरोघरी वृद्ध लोकांचे सर्वेक्षण करून २०२१ मध्ये ३५ गावात २०२२ मध्ये २८ गावात, व दिनांक १४ जून २०२३ ला ग्रामपंचायत भवन खैरी पन्नासे हिंगणा येथे कार्यक्रम घेऊन २५ वृद्ध मंडळींना आधार काठी देत ५१ गावात आधार काठी वाटपाचा संकल्प पूर्ण करत या अडीच वर्षात ११४ गावात वृद्ध मंडळींना आधार काठी देऊन प्रेमरूपी आधार देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष खैरी पन्नासे ग्रामचे सरपंच चंद्रशेखर पिसे, उदघाटक उपसरपंच राहुल पन्नासे, विशेष उपस्थितीमध्ये सचिव सुवासिनी कोल्हे व गावातील प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर पिसे म्हणले की अमरावती जिल्ह्यात गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, लहानुजी महाराज या सारखे थोर संत होऊन गेले, त्याचं जिल्ह्यातील कर्मयोगीचे अध्यक्ष पंकज ठाकरे आहेत म्हणूनच त्यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कार्य होऊन राहले. मी तर म्हणतो की साक्षात या संतांचा अंश पंकज ठाकरे यांच्यामध्ये व त्यांच्या कर्मयोगीमध्ये काम करत आहे म्हणूनच इतके मोठे कार्य कर्मयोगीने उभारले आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की २०२१ मध्ये आम्ही आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलांचे गणपती उत्सवात सत्कार आयोजित केले होते. तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तेव्हा आम्हाला अनेक ठिकाणी वृद्ध मंडळींची अवहेलना मोठ्या प्रमाणात होताना दिसली. त्यांचं शरीर थकल्यावर एखाद्या निरुपयोगी वास्तूप्रमाणे त्यांना एका कोपऱ्यात नेऊन टाकलं आहे. हे कधी मरतात आणि कधी यांची तेरवी करून मोकळं होतो अशी परिस्थिती दिसली, काही ठिकाणी आई वाडीलांनाच वेगळं केलं तर काही ठिकाणी जन्मदाते आईवडील मरण यातना भोगत आहे अशी परिस्थिती दिसली. त्यामुळे, त्यावेळी आम्ही विचार केला की यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य कसं फुलवू शकू, आणि या विचाराचे कृतीत रूपांतर करत आधार काठीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ही आधार काठी देताना गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता वृद्ध मंडळींना प्रेमरूपी आधार देण्यासाठी आतापर्यंत ११४ गावातील वृद्ध मंडळींना आधार काठी देत प्रेमरूपी आधार देण्यात आला. आपला स्वतःचा मुलगा आपल्या आई वडिलांना एक आधार काठी घेऊन देऊ शकत नाही आणि ईश्वराने आमच्याकडून आतापर्यंत ११४ गावात आधार काठी वाटप करून घेतले, त्याबद्दल आम्ही ईश्वराचे प्रचंड ऋणी आहोत. हा संकल्प पूर्ण झाला असला तरी आम्ही निरंतर इतरही गावात ही सेवा देत वृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांना प्रेमरूपी आधार देत राहू..
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली.