बुटीबोरी, १३ जून उधार सामान मिळावे किंवा एखाद्याने पैसे द्यावे म्हणून मागणारा गयावया करतो. पण पैसे देण्याची वेळ आत्यावर तोच देणाऱ्यावर हल्ला करून कृतघ्नपणा दाखवितो. असाच काहीसा प्रकार एमआयडीसी बुटीबोरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेमरीत घडला. प्रज्ज्वल प्रदीप ढेगरे याने आरोपी सुशांत महादेव झाडे, राम राजू पुंगाडी रोशन चिंतामन सोनवणे यांना उधारीवर पैसे दिले होते. त्याच पैशाची मागणी प्रज्ज्वलने केली. यामुळे चिडलेल्या आरोपींनी प्रज्ज्वल ढेगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करीत त्याच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी कलम ३०७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी बुटीबोरीत राहणाऱ्या प्रज्ज्वल ढेगरे याच्याकडून आरोपींनी मोठ्या प्रमाणात उधारीत माल घेतला होता. त्याचे पैसे मागायला गेला असता आरोपींनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे एमआयडीसी बुटीबोरी भागात दहशत निर्माण झाली आहे.

उधारी देणारा दुकानदार स्वतः फार मोठे धाडस करतो. तो ग्राहक नाराज होऊ नये म्हणून त्याला उधारीत सामान देतो. यामुळे एक प्रकारचे दुकानदार ग्राहकाची मदतच करीत असतो. अशावेळी ग्राहकाने न चुकता त्याची उधारी परत करणे अभिप्रेत आहे. मात्र ग्रामीण भागात उधारी मागताना गोड बोलणारे पैसे देण्याची वेळ आल्यावर भांडण करतात. वाद विवाद करीत दुकानदारावर हल्लाही करतात. बुटीबोरीतही असाच प्रकार घडला आहे.
