पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष डी. के. अरीकर यांची माहिती
बुटीबोरी-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या बुटीबोरी येथे २५ व्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन ११ जून २०२३ ला पर्यावरण संवर्धन व विकास समिती नागपूर जिल्हा बुटीबोरी शाखा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचे निश्चित झाल्याची माहिती पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी दिली.
पर्यावरण व प्रदूषण हे अतिशय व्यापक व तितकाच अभ्यासाचा विषय असून मानवी जीवन, पशूपक्षी व प्राण्यांशी संबंधित अस्तित्वाचे ते जैविक प्रश्न आहेत, त्याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुटीबोरी येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित करण्याचे ठरविले आहे, असेही डी. के. आरीकर यांनी सांगितले.
बुटीबोरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन म्हणून केंद्रीय वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी, सहउद्घाटक म्हणून वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, विशेष अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे, आ. अनिल देशमुख, पदवीधर आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहाय्यक संचालक व्ही. एम. मोटघरे, बुटीबोरीचे नागराध्यक्ष बबलू गौतम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, समुद्रपूरच्या नागराध्यक्ष योगिताताई तुळणकर, स्वप्नील मोंढे आदी तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वाकूडकर आणि नागपूरचे जिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
११ जून रोजी होणाऱ्या या पर्यावरण संमेलनात एका सुंदर पर्यावरण विशेषणकाचे प्रकाशनही होणार असून पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण रत्न व पर्यावरण मित्र पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना समजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून त्यांचाही सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तेव्हा इच्छुकांनी पर्यावरण समितीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अमोल घोटेकर, बुटीबोरी (मो.क्र. ९५१८९८४५३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.