दागिने लूटणारा आरोपी जेरबंद

बुटीबोरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, एक आरोपी अटकेत, 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बुटीबोरी, वार्ताहर. महिला घरी एकट्या असताना अनेक गुन्हेगार तोतयेगिरी करून संधी साधत आपल्या गुन्हेगारी हेतूला साध्य करतात. अशा अनेक घटना डोळ्यासमोर असताना देखील सुद्धा सामान्य नागरिकांबरोबर प्रतिष्ठित यास बळी पडत असतानाचे चित्र आहे. अशीच एक घटना बुटीबोरीच्या प्रभाग 1 मधील निवारा सोसायटी येथे घडल्याचे उघडकीस आली असून बुटीबोरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणातही पुरावा नसताना देखील अगदी शिताफीने आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घटनेस जबाबदार एका आरोपीस जेरबंद केले आहे. सरला सरोज मोहंती (43) रा. निवारा सोसायटी, प्रभाग 1 बुटीबोरी असे घटनेतील पीडित महिलेचे नाव असून 1 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 9.45 च्या सुमारास त्या घरी एकट्याच होत्या. दरम्यान दोन अनोळखी इसम त्यांच्या दाराजवळ येऊन ‘तुमच्याकडे दागिने असतील तर ते आम्ही साफ करून देतो’ असे म्हणत अगदी गोडीगुलाबीने महिलेचा विश्वास संपादन करून घेतला. स्वभावाने साध्या सरळ असलेल्या महिलेने देखील
त्यांच्यावर विश्वास करत आपल्या घरातील काही दागिने त्यांना साफ करवून घेण्याच्या उद्देशाने दिले असता अनोळखी इसमांनी हातचलाखी करत दागिने घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे सदर घटनेच्या तक्रारीनंतर
पोलिसांजवळ आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले असता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड आणि पोनी हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत लभाने, पोहवा आशिष टेकाम, प्रवीण देव्हारे, युनूस खान, कुणाल पारधी, पोशी दशरथ घुगरे, आशिष कछवाह, माधव गुट्टे यांचे पथक आरोपींच्या शोधकामी लागले. या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चाचपून आपल्या खबऱ्यांसी संपर्क करत शोधकार्य सुरू ठेवले. दरम्यान शोधकामी असताना पोलिसांना त्यांच्या गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनातील एक संशयित इसम हा नागपूर भागातील शिवनगर, पारडी येथे राहत असल्याची पक्की खबर मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अगदी शिताफीने त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली. त्याने आपले नाव अनिलकुमार उर्फ सुनीलकुमार सत्यनारायण शहा (40) रा. सबोर, भागलपूर, बिहार ह.मू पारडी, शिवनगर, नागपूर असे सांगितले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिस खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचेकडून गुन्ह्यात लांबविलेला मुद्देमाल हस्तगत करून घेत आरोपीविरुद्ध कलम 420,406,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून दुसऱ्या आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी हे आंतरराज्यीय स्तरावर गुन्हे करण्यास सक्रिय असल्याची दाट शंका असून यांचेकडून आणखी अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोहवा आशिष टेकाम करीत आहेत.

जनतेस आवाहन
दारावर येणाऱ्या अनोळखी इसमांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास न करता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून जर एखाद्या अशा इसमावर संशय आल्यास त्यांनी तात्काळ संबंधित पोलिसात संपर्क साधावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *