रेतीच्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक

बुटीबोरी, ता. २ डीझेल भरून नागपूर मार्गे जाण्यासाठी वळण घेत असलेल्या ट्रकला वर्धा मार्गे रेती भरून जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास विस्कळीत झाली.

ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोथली फाट्यावर आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक लेलँड १६ चाकी क्र. ए.पी. ३९ यु.पी २८२६ चा चालक लक्ष्मण प्रसाद श्रीराम कुरण (३२) रा. ग्राम पाटेल, मंढईताला जिल्हा रिवा, मध्यप्रदेश हा वाहनात बोथली फाट्यानजीकच्या पेट्रोल पंप मधून डिझेल भरून नागपूर मार्गे जाण्यासाठी रस्ता निघाला असता नागपूर वरून वर्धा मार्गे येणाऱ्या ट्रक क्र. एम. एच ३२ ए.जे ९७६९ चा चालक अमित शंकर मस्के (३२) रा. महाबळा ता. सेलू, जिल्हा वर्धा याने समोरील वाहनाला जोरदार घडक दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत लभाने, विनोद जाधव आणि अरविंद चौहान यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची नोंद करून पुढील कार्यवाही बुटीबोरी पोलिस करीत आहेत.

वाहतुकीचा खोळंबा
■ धडक देणारा ट्रक रेतीने भरलेला तर वळण घेत असलेल्या ट्रक मध्ये ओले नारळ लादलेले असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *