शिवसेना कार्यकर्त्यांनी दिले पोलिसांना निवेदन
बुटीबोरी, बुटीबोरी परिसराला लागूनच पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील कामाला असणारे कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्यास आहे. मागील काही दिवसांपासून बुटीबोरी परिसरात बरेचसे अवैध धंदे सुरू आहे. त्यात जुगार, सट्टा, मटका, दारू तसेच मादक पदार्थाची विक्री यांचा समावेश आहे. यातून परिसरातील युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. युवकांच्या व्यवसनाधीनतेमुळे परिसरात चोरीचे प्रमाण देखील वाढलेले आहेत. अशा अवैध धंद्यांना कुणाचे तरी पाठबळ आहे, याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत युवक तसेच अनेक कुटूंबाचे जीवन उध्वस्त होत असल्यामुळे आपण हे धंदे तात्काळ बंद करावे, अशा आशयाचे निवेदन स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तसेच बुटीबोरीचे ठाणेदार यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुषार डेरकर, सुनील किटे, नगरसेवक सरफराज शेख, प्रशांत झाडे, निखिल भोयर, ग्रामपंचायत सदस्य गणेश कडू, अमित राऊत, गणेश भोयर, पुंडलीक चौधरी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते .