बुटीबोरी, वार्ताहर. खापरखेडा येथून मुलीच्या भेटीसाठी जात असलेल्या आईवर काळाने वाटेतच घाला घाटला. रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुटीबोरी ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील वेदार्या अपार्टमेंट समोर शुक्वरारी सायंकाळी घडली. प्रमिला प्रल्हाद देवळेकर (63) रा. वार्ड क्र.3, रणछोडदास प्रायमरी शाळेजवळ, खापरखेडा, ता. सावनेर असे मृतक महिलेचे नाव आहे.
देवळेकर यांची मोठी मुलगी शिरुळ येथील व्यंकटेश सिटी येथे वास्तव्यास आहे. तिला भेटायला म्हणून त्या बसमधून बुटीबोरीत पोहोचल्या. राष्ट्रीय महामार्गावरील सातगाव फाट्या नजीकच्या वेदार्या अपार्टमेंटजवळ उतरल्या. व्यंकटेश सिटी येथे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी वर्धा -नागपूर मार्गावरून भरधाव जाणा या ट्रॅव्हल्सने धडक दिली. गंभीर जखमी झाल्या. माहीती मिळताच बुटीबोरी ठाण्याचे सपोनि प्रशांत लभाने आणि पोहवा मनोज वाघ यांनी घटनास्थळ गाठले. प्रमिला यांना उपचारार्थ बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.