
नागपूर मंदिराच्या स्लॅबवरून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने इसमाचा मृत्यू झाला. घटना बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत पादरी ठाणा येथे मंगळवारला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
सतीश विठ्ठल तेलतुंबडे (४२) रा. पादरी ठाणा असे मृतकाचे नाव असून, मृतक फिर्यादी बोथली ठाणा ग्रा.पं.च्या सरपंचा लिलाबाई संजय गायकवाड (४९) यांचा भाऊ आहे.

प्राप्त माहितीनुसार, पादरी ठाणा शिवारात चारगाव रोडवर शनी मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मृतक नेहमी मंदिरात जायचा. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास मंदिरावर चढला. मंदिराच्या २ – ३ फूट उंचीवरवरून ३ फेजच्या वीजतारा गेल्या आहेत.

सतीशचा ताराला अचानक स्पर्श झाला आणि त्याचा मृत्यू झाला.माहिती मिळताच बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील आणि पोहवा प्रशांत मांढरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रवाना केला. तूर्त आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली.

विशेष म्हणजे मंदिराचे काम सुरू करण्यापूर्वी मंदिर व्यवस्थापनाने वीज तारांबाबत वीज विभागाला सूचना दिली होती. मात्र विभागाने काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे कळते