चाकू दाखवून व्यावसायिकाच्या घरी दरोडा
बुटीबोरी: परिचिताच्या घरी कुटुंबासह जेवणाच्या कार्यक्रमाला गेलेल्या व्यावसायिकाच्या बहिणीला अज्ञात आरोपीने चाकू दाखवून रोख १२ लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना १८ जूनला रात्री साडेदहा वाजता बुटीबोरीतील प्रभाग क्र. ९ मध्ये घडली.
बुटीबोरी येथील बाजार ओळीत हारून बेरा (रा. प्रभाग क्र.९, बावलानगर, नवीन वसाहत, बुटीबोरी ) यांचे विदर्भ हार्डवेअर नामक दुकान आहे. फिर्यादीची मुलगी आयशा तौसिफ कच्छी (३२, रा. कडू कॉलनी सौंसर, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) ही महिनाभरापासून बुटीबोरी येथे माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी त्यांच्या परिचिताच्या घरी हजयात्रेनिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रात्री ९ वाजता समोरच्या दाराला कुलूप लावून गेले होते, असे फिर्यादीने तोंडी तक्रारीत नमूद केले आहे. कार्यक्रमात सर्वांचे जेवण झाल्यावर फिर्यादीच्या काकूने आयशाला आपल्याला लिफाफा द्यायचा आहे. तू घरी जाऊन लिफाफा घेऊन ये, असे सांगितले. आयशा रात्री साडेदहा वाजता एकटीच घरी परत आली. समोरच्या दाराचे कुलूप काढून आत प्रवेश केला. तिला हॉलमधील कपाटाचे दरवाजे उघडे दिसले. बेडरूममध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने आत जाऊन पाहिले असता एक अज्ञात इसम तिला दिसला.
तिने त्याला, ‘तुम यहाँ क्या कर रहे हो,’ असा प्रश्न केला असता तो तिला, ‘चूप रहो, चिल्लाना मत’, असे म्हणाला. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता तिने त्याचा रस्ता रोखला. त्याने तिचे केस ओढून ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ती ‘चाची बचाव’, असे ओरडली असता आरोपी त्याच्याजवळचा चाकू काढून तिला जिवे मारण्याची धमकी देत तिथून पळाला. घटनेनंतर तिने भाऊ सोनू बेरा यास फोन करून हकिकत सांगितली. तो लगेच घरी आला. त्याने व्यवसायातील घरी ठेवलेली रक्कम तपासून बघितली. त्यातील १२ लाख रुपयांची रक्कम कमी असल्याचे दिसले. घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले. आयशाने सांगितलेल्या इसमाच्या वर्णनानुसार पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र आरोपीचा शोध लागला नाही. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, ठाणेदार भीमाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचे धागेदोरे जुळविण्यास सुरुवात केली. लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.
आरोपीचा घटनाक्रम संशयास्पद
सर्व कुटुंबीय जेवणासाठी गेले त्यावेळी पुढील दाराला कुलूप लावले होते. मात्र मागील दार उघडेच होते, अशी माहिती आहे. कपाटात ठेवलेल्या पैशाच्या बॅगमध्ये २० लाख रुपये असताना आरोपीने १२ लाख रुपये रक्कम कशी काय लांबविले? अशा संशयास्पद हालचालींमुळे आरोपीबाबत परिसरात तर्कवितर्क काढण्यात येत आहे. खरे तथ्य काय, हे पोलिसांच्या तपासाअंती उघडकीस येईल