बुटीबोरी-‘माझं भारकस स्वच्छ भारकस, सुंदर भारकस, माझी जबाबदारी’ हे ब्रीद घेऊन भारकस परिसरातील नागरिकांना स्वच्छतेची जाणीव व्हावी, परिसर स्वच्छतेची मुख्य जबाबदारी संबंधित यंत्रणेची असली तरी आपणही आपली जबाबदारी पार पाडावी,
या उद्देशाने एमआयडीसी परिसरातील भारकस या गावात दर बुधवारी स्वच्छता अभियानासंदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाते. सरपंच रोशनी आतिष उमरे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र सुरु आहे.
या मोहिमेत वारकरी भजन मंडळी, पथनाट्य, बचतगट, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांच्या मदतीने आकर्षक वेशभूषा करून स्वच्छता अभियानासंदर्भात संदेश, विविध योजनांची माहिती दिली जाते.
प्रत्येक विद्यार्थी व गावकऱ्यांमध्ये पर्यावरण रक्षण व स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी, तसेच परिसर कचरामुक्त व प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेला सहकार्य करावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सरपंच रोशनी उमरे यांनी दिली.
यावेळी ग्रा.पं.सदस्य किशोर ढोक, धनंजय परचाके, सूरज नानवते, रेखा शेंडे, चेतन उरकुडे, गोलू गायकवाड, पंकज गायकवाड, दिलीप नाने, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आदी गावकरी सहभागी झाले होते.