नागपूर: रामटक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना त्यांच्या जात प्रमामपत्रावरून सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे. त्यावर लेखी स्वरुपात म्हणने मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या नोटीसमागे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप बर्वे यांनी केला आहे. जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असून त्यांचे नाव स्पर्धेत आहे. बर्वे या माजी मंत्री व काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या समर्थक आहेत. बर्वे त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असतानाच गुरुवारी अचानक त्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी समितीकडे खोटे दस्तावेज देऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवले, त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करावी,अशी तक्रार वैशाली देविया गाडेगाव (ता. पारशिवनी) यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. त्या आधारावर समितीने बर्वे यांना नोटीस पाढवून त्यावर लेखी म्हणने सादर करण्यास सांगितले आहे.