बोगस मतदार हटवा, हायकोर्टात याचिका

नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमधून बोगस मतदारांची नावे हटविण्यासाठी माजी आमदार विजय घोडमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भातील कारवाईची माहिती मागितली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय भारती डांगरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची दोन-तीन ठिकाणी नावे आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आक्षेप सादर केले होते. परंतु, त्यावर निर्णय घेण्यात आला नाही व ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली, असे घोडमारे यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बाजू मांडताना, यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट २०२४ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम २२ मध्ये प्रक्रिया देण्यात आली आहे, अशी माहिती दिली. तसेच निवडणूक अधिकारी कायद्यानुसार कारवाई करीत आहेत. संबंधित मतदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यापैकी काहींचे उत्तरही मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *