महामार्गावरील ओरिएंटलचे ‘देवदूत’ सत्कारास पात्र

महामार्गावरील ओरिएंटलचे ‘देवदूत’ सत्कारास पात्र अपघात पीडितांच्या मदतीला चोवीस तास सज्ज ९७० जखमींचे वाचविले प्राण

बुटीबोरी (रमण राखुंडे)- बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे.नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही.रस्त्यावर एखादा अपघात घडला,तर तिकडं दुर्लक्ष करून निघून जाण्याची सामाजिक वृत्ती अतिशय घातक, अमानुष आणि संवेदनशून्य आहे. कायद्याचं अज्ञान, पोलिसांची भीती यामुळं अशी पळपुटी वृत्ती वाढते आहे. शिवाय आपल्याला काय करायचंय अशा विचारसरणीमुळेही संवेदनहीनतेच्या दिशेनं घडणारी वाटचाल माणुसकीला बट्टा लावणारी आहे.मात्र या मनोवृत्तीला दूर सारून आजही काही देवांची दूते आपले कर्तव्य पणाला लावून मानवी जीवांच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देत आहे.

ayansh tvs butibori


राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी ओरिएंटल नागपूर बायपास कन्ट्रक्शन प्रा.लि.या टोल व्यवस्थापनाने नेमलेले मेडिकल पथक हे याचप्रकारे महामार्गावर होत असलेल्या अपघात पीडितांसाठी खरे ‘देवदूत’ ठरत आहे.ओरिएंटल टोल प्रशासनाचे प्रोजेक्ट इंचार्ज प्रशांत बर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी विनेश पोटे,
उपव्यस्थापक स्वप्नील मेश्राम,सहाय्यक जनरल मॅनेजर संदेश अग्रवाल,आर पी ओ विनोद पाठक,पॅरामेडिकलचे यतेंद्र भीमटे,रुग्णवाहिका चालक बबलू लोनबले,गस्त चालक अशफाक अली,गस्त मदतनीस मनीष पांडे हे पथक अपघात पीडितांच्या मदतीला चोवीस तास सज्ज राहून मदत करत आहेत.या देवदूतांनी आजवर तत्परतेने जखमींना केलेल्या मदतीमुळे शेकडो लोकांचे प्राण वाचविले आहेत.यामुळे अपघातांनंतरच्या निर्णायक वेळेत जखमींना वैद्यकीय उपचार मिळत असल्याने महामार्गांवरील अपघातांमधील मृतांची संख्या ही नियंत्रणात करण्यासाठी बऱ्यापैकी यश मिळविले आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी साधारण दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महामार्गांचा आवाका पाहता पोलिसांची संख्या देखील तुटपुंजी असल्याने जखमींना तत्काळ मदत पुरविताना अनेक अडचणी येतात.यासाठी शासकीय यंत्रणेने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नियुक्त केली आहे.मात्र या रुग्णवाहिकेच्याही एक पाऊल पुढे ओरिएंटलचे हे देवदूत आपले कर्तव्य पणाला लावून अपघातातील जखमींच्या मदतीला धावून जात असल्याने शेकडो कुटुंबाच्या चेहऱ्यावरील दुःखाचे सावट बाजूला सारत आहे.त्यामुळे हे देवदूत वास्तविक पाहता सत्काराचे खरे धनीपात्र असूनसुद्धा यांच्या पाठीवर कुणीही आजवर साधी कौतुकाची थाप देखील दिली असेल असे ऐकावयास मिळत नाही याची खंत समाजमनातून व्यक्त करण्यात येत आहे.रस्ता सुरक्षा मोहिमेत हे पथक सामाजिक बांधिलकी जपून आपले कर्तव्य पार पाडत आहे ही माणुसकीच्या बाबतीत खरच अभिमानास्पद असून शासनाने वा समाजातील सामाजिक संघटनांनी दखल घेऊन त्यांना त्यांच्या कर्तव्यप्रति प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

दहा वर्षांत ९७० लोकांना जीवनदान
नागपूर हैदराबाद या राष्टीय महामार्गावर ओरिएंटल  नागपूर बायपास कन्ट्रक्शन प्रा.लि.हे टोल व्यवस्थापण
वर्ष २०१२ पासून कार्यशील असून यांच्या कार्यक्षेत्रात बेलतरोडी,हिंगणा तसेच बुटीबोरी पोलिस हदी येतात.हिंगणा आणि बुटीबोरी पोलिस हद्दीत मागील दहा वर्षात झालेल्या हैद्राबाद मार्गावरील अपघातातील एकूण ९७० लोकांना या पथकाने तात्काळ मदत देऊन जीवनदान दिले आहे.अनेक अपघातांमध्ये पोलिस हदीचा वाद पुढे येत असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. मात्र त्याची तमा न बाळगता जखमींना तात्काळ उपचार मिळावे यासाठी ते आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे हाताळण्याचे धाडस करतात. त्यांच्या या माणुसकीतुन केलेल्या धाडसी वृत्तिकरिता पोलिस प्रशासन देखील योग्य ते सहकार्य करतात


‘घास’ नाही तर ‘कर्तव्य’ महत्वाचे
सामाजिक बांधिलकी म्हणून या पथकासी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी अपघातप्रसंगी त्यांना आलेले काही अनुभव बोलून दाखविले.”अशा कित्येक अपघाताची माहिती जेव्हा आम्हाला मिळत असते तेव्हा आमच्या हातात अन्नाचा घास असतो. अशा प्रसंगी आम्ही हातात असणाऱ्या त्या घासाला महत्व देत नसून आपल्या हाताने होणाऱ्या कर्तव्याला प्राथमिकता देतो.जेणेकरून अपघात पीडितांना तात्काळ मदत करून त्यांचा जीव वाचविण्याचे सत्कार्य आमच्या हातून घडायला हवे असा आमचा मानस आहे.” या देवदूतांच्या या विचारांना मानाचा मुजरा…!


कोरोनाकाळातील माणुसकी
दोन वर्षांपूवी कोरोना संकटात शासनाने लोकडाऊन घोषित केले होते. त्यावेळी या मार्गावरून हजारो परप्रांतीय आपल्या राज्यात पायदळी निघाले होते त्यावेळचे दृश्य हे सर्वांनाच अवगत आहे.एकीकडे सर्व नागरिक घरी बसून होते तर दुसरीकडे ओरिएंटल टोल व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी हे स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून त्या वाटसरूंना मदत करत होते.बोरखेडी (रे) तसेच बायपास टोल प्लाझा वर त्या हजारो वाटसरूंना भोजनादान करून दिलासा देण्याची माणुसकी निभावली.त्यावेळी त्यांच्यात कोणतीही व्यवसायिक वृत्ती नव्हती हे विशेष.. !

“आमच्या कार्यक्षेत्रात अपघात नियंत्रण,पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन,अपघात संभाव्य ठिकाणांवर योग्य त्या उपाययोजना यासाठी प्राथमिकता देणे हे आमचे आदीकर्तव्य आहे.जबाबदारी म्हणून अपघात पीडितांना कसे हाताळावे यासाठी आमच्याकडून मेडिकल टीम ला प्रशिक्षण दिले गेले आहे.आमचे कर्तव्य प्रसिद्धीसाठी नाही मात्र नागरिकांकडून देखील सहकार्य अपेक्षित आहे.”- प्रशांत बर्गी,प्रोजेक्ट इंचार्ज, ओरिएंटल टोल व्यवस्थापन.

“ओरिएंटल टोल प्लाझाच्या मेडिकल टीम चे कार्य कौतुकास्पद असून त्यांचे पोलिसांना मोठया प्रमाणात सहकार्य मिळत असते. अपघात पीडितांचा जीव वाचविणे ही प्राथमिक जबाबदारी असून ती हे पथक अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.”- भिमाजी पाटील,पोलिस निरीक्षक, बुटीबोरी