सिडको वसाहतीमधील पाणी समस्या कायमची निकाली लावण्याचे निर्देश
बुटीबोरी येथील सिडको वसाहत ही गर्भश्रीमंतांची वस्ती आहे. परंतु या वसाहतीत राहणान्या नागरिकांना गत दोन वर्षांपासून योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची येथे राहणाऱ्या नागरिकांची ओरड आहे. नागरिकांची हीच ओरड लक्षात घेत हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी आज शुक्रवारी सिडको व एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. सिडको वसाहतीमधील पाण्याची समस्या कायमची निकाली लावण्याचे आदेश त्यांनी दिले.
मेघदूत प्रकल्पा अंतर्गत असलेल्या सिडको वसाहतीत अत्याधिक कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागात नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने नागरिकांची तात्पुरती समस्या सोडविण्याकरिता बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनी नागरपरिषदेद्वारे टँकर लावून पाणीपुरवठा करीत आहे. महत्वाची बाब अशी की, सिडको वसाहतीत नगरपरिषदेच्या वित्तरण व्यवस्था नसून एमआयडीसीद्वारा पाणीपुरवठा केला जातो.
परंतु दोन वर्षांपासून सुरू असलेली ही पाण्याची जीवघेणी समस्या येथील अधिकारी सोडवू शकले नाही. त्यामुळे सिडको वसाहतीतील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याकरिता आज आ समीर मेघे यांनी सिडको व एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणी समस्येवर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या.
त्यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेन्याकरिता सिडकोतर्फे अभियंता जामनिकर, एमआयडीसीतर्फे अभियंता जोगवे, उपअभियंता कावळे, कनिष्ठ अभियंता बारमने आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हापरिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, मंगेश आंबटकर, दीपक गुर्जर, मधू वालदे, विजू सारडा, शाशिन अगरवाल, अशोक बलदुआ, महेंद्र गुल्हाणे, मिलिंद राजस, साळुंखे आदी उपस्थित होते.