
बुटीबोरी : चार दिवसांपूर्वी मित्रांसोबत नदीवर मासोळ्या पकडण्यास गेलेला इसम पाय घसरून पडल्याने नदीच्या पुरात वाहून गेला. मात्र तो अजूनही गवसला नाही. दिनेश सुदाम शहा ( ३५, रा. भवानीपूर, ता. संग्रामपूर, जि. मोतीहारी, बिहार, ह.मु. टेक टाउन, रुईखैरी, जि. नागपूर) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे.

मुन्नाकुमार सुरेश दास (३२, रा. टेक टाउन, रुईखैरी, जि. नागपूर) यांच्या तक्रारीनुसार दिनेश हा २३ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता काही मित्रांसोबत गणेशपूर शिवारातील कृष्णा नदीपात्रात मासोळ्या पकडण्याकरिता गेला होता. मासोळ्या पकडताना अचानक नदीचे पाणी वाढले. त्या लगबगीत पात्रातील दगडावरून पाय घसरला आणि तो वाहून गेला. मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाणी वाढल्याने त्याचा थांग लागला नाही. घटनेची माहिती एमआयडीसी बोरी पोलिसांना मिळताच त्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. मात्र चार दिवस उलटूनही त्याचा शोध लागला नाही. दिनेशचा रंग गोरा, गोलसर चेहरा, केस काळे, अंगात फिक्कट खाकी रंगाची टी शर्ट, कंबरेवर खाकी रंगाची नाइट पॅन्ट आहे. कुणाला आढळल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी बोरी पोलिसांनी केले आहे.
