लोखंडी रॉड मारून सहकामगाराची हत्या

दोन कामगारात भांडण, एमआयडीसी बोरी ठाण्याअंतर्गत घटना

बुटीबोरी, वार्ताहर. क्षुल्लक कारणावरून दोन कामगारांत भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर लोखंडी रॉडने जोरदार वार केले. ज्यात कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील वेदसिद्ध प्रॉडक्ट कंपनीमध्ये दि. 15 आक्टोंबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.

शांताराम मोरे (52) रा.नवीन वसाहत बुटीबोरी असे घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात वेदसिद्ध प्रॉडक्ट प्रायवेट लिमिटेड प्लॉट क्र.ए -46 असून त्यामध्ये सिमेंट ब्रिक्सचे उत्पादन तयार करण्यात येते. या कंपनीमध्ये मृतक हे मागील अंदाजे 3 वर्षांपासून कार्यरत होते. घटनादिनी ते नेहमीप्रमाणे कामावर असताना घटनावेळी वाहन भरतीच्या कारणावरून त्यांचे सहकामगार जयकुमार भली मडावी रा. सुचा मेटा त. घनसोर, जी शिवणी, मध्यप्रदेश ह. मु. वेदसिद्ध कंपनी याच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने जयकुमार याने मृतक शांताराम यांचेवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. त्यात शांताराम हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी बोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणी करिता रवाना करून फिर्यादी आकाश मोरे याचे तक्रारीवरून आरोपी जयकुमार विरोध कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *