ईव्हीएम विरोधात केदारांचा शंखनाद

■ बोरखेडी (रेल्वे) येथे राकाचे दिवाळी स्नेहमीलन ■ खासदार श्यामकुमार बर्वे यांचा सत्कार

नागपूर : सत्ता ही देशातील, राज्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असते, परंतु सत्ता ही भाजप व महायुतीतील मंडळीसाठी स्वतःचे घर भरण्यासाठी आहे. यांना राज्यातील, देशातील जनतेशी काहीही देणेघेणे नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक करत लोकशाहीचा गळा घोटला. सत्ता मिळविण्यासाठीच भाजपणे देशाच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे आम्हा सर्वांना रस्त्यावर उतरून ईव्हीएम विरोधात आवाज उचलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सुनील केदार यांनी बोरखेडी (रेल्वे) येथे बोलताना काढले. बोरखेडी (रेल्वे) येथे १ डिसेंबर रोजी नागपूर पंचायत समितीचे सदस्य माजी उपसभापती संजय चिकटे व मित्र परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १२ व्या दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील केदार तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार विजय घोडमारे पाटील, नागपूर जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि.प. सदस्य उज्वला बोढारे, जि. प. सदस्य दिनेश बंग, जि. प. सदस्य वृंदा नागपुरे, खरेदी विक्री सोसायटी अध्यक्ष वसंत कांबळे, प्रकाश हांडे, विष्णू माथनकर, नागपूर पंचायत समिती सभापती रूपाली मनोहर, नागपूर कृउबा समिती सभापती अहमद बाबू शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, डॉ. रमण चौधरी, राजू गावंडे, मंगेश सवाने, बोरखेडी सरपंच स्वाती धुर्वे, उपसरपंच सुनील ढोके, ग्रा.पं. सदस्य कमलाबाई भोजने, लिना रावले, मेघा फंड, दीपाली मसराम, दीपचंद कांबळे, आलागोंदी सरपंच शालिनी भुते, ममता बरंगे आदी उपस्थित होते. दरम्यान २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघातून खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भरघोष मतांनी विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दीपचंद कांबळे, प्रास्ताविक संजय चिकटे तर आभार देवकी इवानाते यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर पं. स. सदस्य संजय चिकटे व मित्र परिवाराने केले होते.

आम्ही पुन्हा निवडणुका लढू आणि जिंकू

पुढे बोलताना केदार म्हणाले की, ज्या महाराष्ट्रातील जनतेने चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३२ खासदार निवडून दिले त्या हिशोबाने विधानसभेत १५० च्या वर आमदार निवडून यायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. मग तुम्ही कसे म्हणता ईव्हीएम घोटाळा नाही? असा खोचक सवाल केदारांनी यावेळी केला. जर अवकाशातील यांनाना आम्ही जमिनीवरून हाताळू शकतो तर कुठल्या इलेक्ट्रॉनिक्स मशिनला हॅक करू शकत नाही का? आम्ही निवडणूक हरलो, परंतु तुम्ही असे समजू नका की, सुनील केदार आता थकला, घाबरला किंवा पळाला. आम्ही पुन्हा निवडणुका लढू आणि जिंकू असेही ते यावेळी आवर्जुन म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *