पिण्याच्या पाण्यानंतर आता हवा प्रदूषणाचे संकट कंपनीच्या धुराने कोंडतोय श्वास

बुटीबोरी, वार्ताहर, एकीकडे अनेक वर्षापासून बुटीबोरीवासीयांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. ही समस्या सुटत नाही तोच आता हवाप्रदूषणाचे संकट नागरिकांच्या आरोग्यावर टांगती तलवार बनले आहे. नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग 7 मधील एका कंपनीच्या बायलर ऐन पहाटे सोडण्यात येणाऱ्या काळ्याकुट्ट धुराने नागरिकांचा श्वास कोंडायला लागला आहे.

मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने आगामी काळात हे चित्र नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘धोक्याची घंटा’ ठरणार आहे हे तितकच सत्य आहे. हा घातक धूर नागरिकांच्या आरोग्यावर उठला आहे. नियमांची पायमल्ली होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असूनही प्रदूषण विभाग निद्रावस्थेत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीत येत असलेल्या प्रभाग क्र.7 मधील कमर्शियल झोनमध्ये वैभव प्लास्टो प्रिंटिंग अँड पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनी आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या बायलरमधून अगदी पहाटेच काळा धूर निघत असून देखील याकडे जबाबदार अधिकारी कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महत्त्वाची बाब अशी की कंपनी लगतच रहिवासी क्षेत्र आहे. शिवाय नजीकच हॉस्पिटल, शिकवणी वर्ग आदी देखील आहे. असा संवेदनशील परिसर असताना हा प्लांट सुरू करण्याची परवानगी कशी काय मिळाली ? असा संशय नागरिकांनी उपस्थित केला आहे. कसे होईल शहर निरोगी? दैनंदिन
खानपानात झालेल्या बदलामुळे आज प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या आजारासी बाधित आहे. त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, दमासारखे श्वसनाचे आजार आदींचा समावेश आहे. यातून निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर हे प्रत्येकाला पहाटेच्या शुद्ध वातावरणात फिरायला जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शहरातील शेकडो आबालवृद्ध हे पहाटे पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतात. मात्र या कंपनीने आपल्या धुराचा खेळ देखील अगदी पहाटेच सुरू केलेला असतो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे विकार जडत आहेत. या बड्या उद्योगपतींसी वैर कोण घेणार म्हणून तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नाहीत. परिणामी तक्रारीअभावी प्रशासनाकडून कारवाई होत नाही. शहर वासीयांना निरोगी जीवन देण्याचा संकल्प करणाऱ्या प्रतिनिधींकडून हे शहर कसे निरोगी राहील ?… असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

परवानगी मिळालीच कशी ?
ज्या ठिकाणी हा उद्योग सुरू आहे तो परिसर संपूर्ण रहिवासी क्षेत्र असून नजीकच मोठ मोठे हॉस्पिटल, शालेय शिकवणी वर्ग आदी असून अशा ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीचा अर्ज करताना तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांचा नाहरकत दाखला, मंडळ अधिका-याने प्रत्यक्ष जागा पाहणी केल्याचा दाखला, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, शहर हद्दीत असल्यास नगरपालिका, महानगरपालिका यांच्या परवानगीचा दाखला तहसीलदारांकडे सादर करावा लागतो. सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून तहसीलदार उद्योग सुरू करण्याची परिसरातील परवानगी रहिवाशांना देत असतात. वास होणार अशा नाही उद्योगामुळे याची काळजी घ्यावी लागते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार देखील संबंधित प्रशासणाला असतो. एकंदरीत सर्व बाबींचा विचार करायचा तर अशा उद्योगाला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न सुजाण नागरिकांनी उपस्थित केला असून नागरिकांच्या जिवासी खेळणाऱ्या या उद्योगासाठी जबाबदार कुणास धरायचे असा सवाल देखील उपस्थित होत आहे.