बुटीबोरी, वार्ताहर. रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना एक संशयित व्यक्ती आढळून आला. पोलिसांना बघून पळ काढताना त्यास ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेतली असता त्याचे जवळ ब्राऊन शुगर आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.
ही घटना दि. 19 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बुटीबोरी मुख्य चौकात घडली. विक्रमसिंग सबजीतसिंग टाक (20) रा. जुना चौक, विक्तू बाबा मंदिर जवळ, बाबूपेठ, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी की, घटनावेळी बुटीबोरी पोलिस ठाण्याचे एपीआय प्रशांत भोयर, पोह प्रशांत मांढरे, तिलक रामटेके तसेच युनूस खान हे शहरात रात्रगस्ती करत होते. दरम्यान त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास बुटीबोरी मुख्य चौकात एक संशयित व्यक्ती दिसून आला.
त्याची विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी आपले वाहन थांबविले. पोलिसांना बघून ती व्यक्ती पळून जाण्याच्या बेतात असता त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आणि त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या खिशात एक पांढऱ्या रंगाच्या कागदी पुडी मध्ये काही असल्याचे आढळून आले.
पुडी उघडून बघितले तर त्यात तपकिरी रंगाची पावडर होती. त्या व्यक्तीस याची सखोल विचारपूस करून देखील काही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पोलिसांनी ती पावडर फॉरेन्सिक तपासणी करिता पाठवून आरोपीला ताब्यात घेतले.
अहवालानुसार ती पावडर ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा नोंद करून 6 ग्रॅम ब्राऊन शुगर तसेच मोबाईल असा एकूण 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.