चुकीच्या लेनने जाणाऱ्या मालवाहूची कारला धडक, चालकाचा मृत्यू

दाम्पत्यासह मुली जखमी : रुईखैरी उड्डाणपुलावरील अपघात

बुटीबोरी: चुकीच्या लेनवरून जाणाऱ्या छोट्या मालवाहू (टाटा एस ) वाहनाने समोरून येणाऱ्या कारला जोरात धडक दिली. त्यात वाहनचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कारमधील दाम्पत्य गंभीर व त्यांच्या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या.

मृत राजू काटोले ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) पोलिस हद्दीतील रुईखैरी शिवारातील उड्डाणपुलावर शनिवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ठाण्याच्या राजू विठ्ठल काटोले (वय ४५, रा. शिरूळ, ता. हिंगणा) असे मृत वाहनचालकाचे, तर कृष्णा राजेंद्र शुक्ला (३५) व पूनम कृष्णा शुक्ला (३४) अशी गंभीर आणि स्वधा शुक्ला (११) व प्रश्मा शुक्ला (८) रा. नांदेड अशी किरकोळ जखमींची नावे आहेत.

शुक्ला कुटुंबीय एमएच- २८ / बीएक्स – ९१२९ क्रमांकाच्या कारने नांदेडहून यवतमाळ, नागपूर मार्गे वृंदावन (गुजरात) ला जात होते. ते बुटीबोरी नजीकच्या वाय पॉईंटजवळील रुईखैरी उड्डाणपुलावर पोहोचताच चुकीच्या लेनवरून रुईखैरी येथून बुटीबोरीला येणाऱ्या एमएच ४० / बीजी- ९४१८ क्रमांकाच्या टाटा एसने कारला जोरात धडक दिली.

यात राजू काटोले, कृष्णा शुक्ला व पूनम शुक्ला गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच बुटीबोरी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे राजू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक मुन्ना ठाकूर करीत आहेत.

-तर अपघात झाला नसता

• कृष्णा शुक्ला यांना नागपूरला यायचे होते. मार्गाविषयी माहिती नसल्याने त्यांनी उड्डाणपुलावरुन कार घेतली. ते पुलालगतच्या सर्व्हिस रोडने आले असते तर हा अपघात झाला नसता.
■ राजू काटोले हे चुकीच्या लेनवरून वाहन चालवित होते. त्यांनी एक किमीचा वळसा घेऊन योग्य लेनवरून वाहन घेतले असते तर हा अपघात टळला असता. चालकांच्या चुका अपघाताच्या पथ्यावर पडल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *