सराईत चोरट्यास ठोकल्या बेड्या

- बुटीबोरी, वार्ताहर, चोरीच्या अनेक घटनेमध्ये सामील असणाऱ्या सराईत चोरट्यास बुटीबोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संकेत देवराव झोडापे (20) रा. चनोडा, ता.उमरेड जिल्हा नागपूर, म्हाडा कॉलोनी बुटीबोरी असे अटक केलेल्या चोराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या आदेशावरून ठाणेदार प्रताप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सपोनि नीलेश चवरे, पोहवा आशिष टेकाम, युणूस खान, पोशि दशरथ घुगरे, माधव गुटटे, पोशि गौरव मोकडे यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील फिर्यादी नामे सुरेश बाबूलाल विस्नोई (27) रा. करनाभुंका ग्राम पो.स्ट सिंदरी तह. जालोर जिल्हा जोतपूर ह.मू. वार्ड नं 3 बस स्टॅण्डजवळ बुटीबोरी, ता. जि. नागपूर यांनी पो.स्टे. ला येऊन तोंडी तक्रार दिली की, 4 मार्च रोजी सकाळी 10 च्या सुमारास चौधरी हॉस्पिटल बुटीबोरी समोर त्यांच्या चहाच्या ठेल्याचे शेजारी लावलेली जुनी वापरती इंडिका गाडी कार क्र. एम. एच 27 ए.सी 2771 कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेली, अशी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम 303 (2) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद असुन तपासात घेतला सदर अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी नमूद एक पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथक तपासकामी असताना त्यांनी गोपनीय खबरेच्या माध्यमातून पोलिसांनी रुई खैरी शिवारातून एका संशयितास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता सुरवातीस त्याने थातुरमातुर उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.