बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसीत अशुद्ध पाणी

बुटीबोरी, हिंगणा व वाडी या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घनकचरा वर्षानुवर्षे साठविण्यात आला आहे. सांडपाणी तलावात साचून अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना त्रास होतो. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून सांडपाणी व घनकचऱ्यावर तातडीने कार्यवाही करावी व या कामास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. रविपीन इटनकर यांनी दिले.

जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा निर्यात प्रचालन समिती व स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एम. डी. पटेल तसेच संबंधित अधिकारी व जिल्हा उद्योग मित्र समितीचे उद्योग प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. उद्योग व शेती विषयक मालाच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी जिल्हा निर्यात प्रचालन समिती गठित करण्यात आलेली असून ती यासाठी प्राधान्याने पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून विदेश व्यापार महानिदेशालयाचे प्रतिनिधी उपाध्यक्ष आहेत. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सचिव आहेत. तर जिल्हा वस्तू व सेवाकर अधिकारी नागपूर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, अपेडाचे अधिकारी, जिल्ह्यातील निर्यात प्रचालन परिषदेचे सदस्य प्रतिनिधी, जिल्ह्यातील दोन आद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, नाबार्ड नागपूरचे अधिकारी संचालक, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांचे प्रतिनिधी सदस्य, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य

आहेत तर निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी व सल्लागार आद्योगिक संघटना आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मुद्दमवार यांनी सांगितले. बैठकीत वाडी येथील सांडपाणी प्रक्रिया, हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील वर्षानुवर्षे साठलेला घनकचरा, हिंगणा व वाडी येथील वाहतुकीसाठी बायपास रोड, एमआयडीसी हिंगणा येथे सीईटीपी स्थापित करणे, बुटीबोरी येथील इसीसचे रुग्णालय, स्थानिकांना रोजगार, आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *