भोपाळ येथून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात
बुटीबोरी : स्थानिक पोलिसांनी अट्टल घरफोड्याला भोपाळ येथून अटक केली. त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (७ जानेवारी) करण्यात आली.

बुटीबोरी हद्दीतील गल्ली नं. ६. लोकमत कॉलनी येथील फिर्यादी अंकुश रवींद्र बेडकर (३६, रा. प्लॉट नं.२४) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली की, ३१ डिसेंबर २०२४ ला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून जम्मू-काश्मीर येथे कुटुंबासह फिरण्यास गेले होते. २ जानेवारीला परत आले असता त्याच्या राहत्या घराच्या बेडरूममधील लाकडी आलमारीतील बचतीच्या गल्ल्यातील अंदाजे पाच हजार रुपये व मुलीच्या कानातील सोन्याच्या कड्या अंदाजे वजन पाच ग्रॅम किंमत दहा हजार रुपये, सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआर किंमत एक हजार रुपये, असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध २८/२०२५ कलम ३३१ (३),(४), ३०५ भा.न्या.स. अन्वये गुन्ह्याची नोंद केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या आदेशान्वये व ठाणेदार प्रतापराव भोसले यांच्या मार्गदर्शनात एपीआय प्रशांत लभाने, पोलीस हवालदार आशिष टेकाम, पोलीस हवालदार कुणाल पारधी, पोलीस हवालदार युनूस खान, पोलीस शिपाई दशरथ घुगरे, पोलीस शिपाई माधव गुट्टे, पोलीस शिपाई गौरव मोकडे व गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये कार क्रमांक एमपी ०४/ झेडवाय ६२४० ही भोपाळ येथील असल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये भोपाळ येथे जाऊन या कारमालकाचा शोध घेण्यात आला. कारसह त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने सांगितले की, कार्तिक अंतरसिंग राजपूत (२६, रा. भोपाळ), सुंदरम पवनकुमार पंथी (२१, रा. भोपाळ) व त्याच्या साथीदारांसह तिरूपती येथे फिरण्यासाठी गेल्याचे सांगितले. त्याची चौकशी केली असता आरोपी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. कारसह दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.