भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक

एका प्रवाशाचा मृत्यू : आसोला शिवारातील घटना

बुटीबोरी : चालकाचा वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटला आणि त्या ट्रॅव्हल्सने रोडलगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून डोकावत असलेल्या एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला.

ही घटना एमआयडीसी बुटीबोरी (ता. हिंगणा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा-नागपूर महामार्गावरील आसोला शिवारातील धाब्याजवळ मंगळवारी (दि.१०) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

मनीष सुरेश पवार (२०, रा. मकराना, काला नाला, ता. देगाना, जिल्हा नागोर, राजस्थान) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तो मागील काही महिन्यांपासून रामकृष्ण नगर, दिघोरी, नागपूर येथे राहायचा. एमएच-३२/क्यू-६६९९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स काही प्रवाशी घेऊन वर्धा शहरातून नागपूरला जात होती.

ही ट्रॅव्हल्स बुटीबोरी (ता. नागपूर) नजीकच्या आसोला शिवारातील एका धाब्याजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि ती रोडलगत उभ्या असलेल्या एनएल-०१/एएच-२१२० क्रमांकाच्या ट्रकवर धडकली.


यात मनीषला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला इतर ट्रॅव्हल्स चालकासह इतर प्रवाशांना फारशी दुखापत झाली नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. त्यांनी मनीषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला.

याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक साजिद मुजफ्फर अली सय्यद (३३, रा. कामठी रोड, नागपूर) याच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

ट्रक चुकीच्या ठिकाणी उभा

प्रवास करीत असताना मनीषने ट्रॅव्हल्सची खिडकी उघडून बाहेर डोकावून बघितले आणि त्याचे डोके ट्रकच्या भागावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. वर्धा-नागपूर महामार्गावरील रहदारी व वाहनांची संख्या विचारात घेता अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक हा चुकीच्या ठिकाणी उभा केला होता. शिवाय, ट्रक चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *