लावणी लोकनृत्य मध्ये विशेष काम.
बुटीबोरी : येथील अंबादास धुळे ला भाग्यश्री फिल्म नाट्य अकादमी यांच्या तर्फे कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे लावणी लोकनृत्य मध्ये विशेष योगदानाबद्दल नागपूर भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला ही माणसाला जीवन जगायला शिकवते. जीवन तर सगळे जगत असतात मात्र जगायचे कसे हे कलेमुळे कळते. तसाच नृत्य कलेसाठी आपले सर्वस्वी अर्पण करून तन-मन-धनाने नटेश्वराची साधना करणारा एक अवलिया म्हणजे अंबादास धुळे.
मुळचा बुटीबोरी चा असलेल्या अंबादास ला लहानपणापासूनच नाट्यकलेची आवड होती. शिक्षणासाठी तो बहिणीकडे मन्यालीला आला व महाविद्यालय शिक्षण बिटरगाव येथे सुरू केले. थोडीशी स्त्रीसारखी लख असल्याने महाविद्यालयात,शाळेत मित्र त्याला चिडवत होते. मात्र त्याने त्या चिडवण्याचा कधी राग मानला नाही. आपल्यातले दोष हेरून त्याचे भांडवल करून त्यानी आपली कला जोपासण्याचे ठरवले. महाविद्यालयीन शिक्षण बिटरगाव येथे केल्यानंतर त्याने थेट नागपूर गाठून नृत्य कलेचे प्रशिक्षण घेतले. व तो वेगवेगळ्या नृत्यस्पर्धा गाजवू लागला. हुबेहुब एखाद्या स्त्रीसारखी लावणी सादर केल्यानंतर अक्षरशा प्रेक्षकांना सुद्धा भुरळ पडत असे.
टीव्हीवर येणाऱ्या वेगवेगळ्या डान्सिंग शो मध्ये सुद्धा अंबादास ने आपले कलेचे प्रदर्शन केले आहे. आज पावेतो त्याच्या नृत्य कलेमुळे त्याला समाजात भरपूर मानसन्मान मिळाला. वेगवेगळ्या संस्थेने त्यांना पुरस्कार, सन्मानपत्र देऊन त्याचा येथोचीत सन्मान केला. हे सगळे फक्त त्याच्या अंगी असलेल्या नृत्य कलेमुळे झाले असे अंबादास अभिमानाने सांगतो. समाजामध्ये वावरत असताना काही लोकांनी त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्याने आपले ध्येय गाठले. एखाद्या स्त्रीसारखी त्याची हालचाल असल्याने त्याला या समाजाने तोडून बोलले.
पण त्याला कधी त्या गोष्टीचा राग आला नाही. आणि त्यामुळेच तो यशस्वी नृत्यकलाकार झाला. आज त्याने स्वतःचे डान्स स्कूल सुरू केले असून गरीब होतकरू मुलांना तो मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या पंखांना बळ देतोय. अंबादास यांनी या संघर्षमय जीवनातून आपला यशाचा मार्ग निवडला आणि आपले ध्येय गाठले.आज समाजातील अशा असंख्य अंबादास यांनी बुटीबोरीच्या अंबादास धुळे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.