आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे बुटीबोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वाहनतळाची व्यवस्था करा

नागपूर : बुटीबोरी नगरपरिषदेने मालवाहक वाहनांकरीता येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली कायमस्वरुपी वाहनतळाची व्यवस्था करावी, या मागणीसाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे नागपूर ग्रामीण तालुका सचिव कैलास मडावी यांचे नेतृत्वात मालवाहक, रिक्षा-मोटार चालक, मालकांनी बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुदे यांना निवेदन सादर केले.

दरम्यान मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत उचित कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. निवेदन देतेवेळी कैलास मडावी, राजू गावंडे, प्रकाश आमटे, संजय वानखेडे, नामदेव माडवे, मारोती नेवारे, आकाश देवतळे, विटल भोयर, शंकर भुजबळ, संजय साखरे, सुनील भगत, राजूनागोसे, राजेश गायकवाड, ईखाक शेख, शोनू शेख, भागवत शर्मा, तन्मय बोरसरे, रवि काका, सचिन माहाळकर, कमलाकर अवचट, अमित घोडेशवर, रितीक नाकले आदींसह मालवाहू वाहनांचे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उड्डाणपुलाखाली वाहने पार्क न करण्याची तंबी

बुटीबोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली अनेक वर्षापासून मालवाहक गाड्यांचे पार्किंग आहे. अनेक स्थानिक बेरोजगार छोट्यामोठ्या मालवाहक गाड्या घेऊन तिथे रोजगार करतात. बुटीबोरी ही पंचतारांकित एमआयडीसी असल्याने अनेक प्रकारच्या कच्या व पक्क्या मालाची वाहतूक या भागातून करण्यात येते. या भागातील लोकांना तसेच बुटीबोरीतील नागरिकांना मालवाहतूक करायची असेल तर येथूनच किरायाने गाड्या कराव्या लागतात. महत्त्वाचे म्हणजे या पार्किंगमुळे वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. शिवाय येथील वाहनतळामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. असे असताना दि. १ ऑक्टोबरला पोलिसांनी येथील मालवाहक गाडी चालकांना इथे आता गाड्या पार्क करता येणार नाही अशी तंबी देऊन तेथील गाड्या हटवण्याचे फर्मान काढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *