पत्नीसह दोन चिमुकल्यांची रस्त्याकडे नजर

सात दिवसांपासून चाळीस वर्षीय गृहस्थ बेपत्ता

बुटीबोरी : अनेक दिवसांपासून कौटुंबिक मालमत्तेवरून उद्भवलेल्या वादातून एक गृहस्थ घर सोडून बेपत्ता झाला. सात दिवसांपासून बाबा घरी आले नाही म्हणून हंबरडा फोडत दोन चिमुकले आईसह रस्त्याकडे नजर लावून बसले आहेत.

ही घटना एमआयडीसी बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विलास सेवकराम उमाटे (४०, रा. गणेशपूर, ता. हिंगणा ) असे बेपत्ता गृहस्थाचे नाव आहे. विलासची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो टाकळघाट येथील एका किराणा दुकानात नोकरी करून पत्नी, एक १० वर्षीय मुलगी आणि एक आठ वर्षांच्या मुलासह उदरनिर्वाह करीत होता.

परिवारापासून विभक्त झाल्याने गणेशपूर येथे किरायाचे राहत होता. मुलांचे शिक्षण आणि डोक्यावरच्या कर्जाने खचला होता. बऱ्याच दिवसांपासून त्याचा टाकळघाट येथील रहिवासी त्याचे आईवडील व दोन भावांत कौटुंबिक मालमत्तेवरून वाद होता. यातूनच तो १३ जूनला मोटरसायकलने सायंकाळी आठ ते साडेआठ वाजता टाकळघाट येथे गेला. त्या दिवशी परत त्याचा परिवारातील सदस्यांसोबत मालमत्तेवरून वाद झाला. रागाच्या भरात त्याने आपली मोटरसायकल आणि पर्स तिथेच टाकून एका परिचिताच्या दुचाकीवर बसून विक्तूबाबा देवस्थान मार्गाने निघून गेला, असे काहींचे म्हणणे आहे. दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांनी देवस्थान परिसरातील बारमध्ये दारू पिली. नंतर त्याच्यासोबतच्या परिचित दुचाकीचालकाला सोडून तो रात्री दहा ते साडेदहा वाजता कुठे बेपत्ता झाला. याचा अद्याप शोध लागला नाही. त्याची तक्रार त्याची पत्नी योगिता हिने एमआयडीसी बोरी पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र त्याचा शोध न लागल्याने पत्नी आणि दोन मुले बाबा आले नाही म्हणून रस्त्याकडे नजर रोखून बसले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *