बुटीबोरी (नीतीन कुरई): विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे आणि तो पाया अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नातून निपुण भारत कृती कार्यक्रम आखण्यात आला असून शिक्षकांनी आपल्या प्रयत्नाचे अधिक बळ लावून २०२६ -२७ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा मूलभूत साक्षर आणि अंकगणित शिकलेला असावा हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असे मत शिक्षण परिषदेत रामकृष्ण ढोले यांनी व्यक्त केले.

दिनांक ११ एप्रिल रोजी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल,शंकरपुर येथे संयुक्त शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी मंचावर रामकृष्ण ढोले (केंद्रप्रमुख बुटीबोरी ) संघपाल मेश्राम (केंद्रप्रमुख हुडकेश्वर) मोहन जुमडे, चांदूर सर,उमक सर ,डॉ.तुषार चौहान (मुख्याधपक गोंडवाना पब्लिक स्कूल) मंचावर उपस्थित होते.
ढोले सर यांनी आपल्या मनमोकळे बोलण्याच्या शैलीतून या कृती कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली.त्यांनी सांगितले की किमान ७५% विद्यार्थ्यांची प्रगती साध्य व्हायला हवी.शिक्षण क्षेत्रात झालेल्या विविध सर्वेक्षणांद्वारे भारतातील बहुतांश प्राथमिक वयोगटातील मुलांच्या अभ्यास आकलनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या शैक्षणिक संकटाचे निवारण करण्यासाठी सरकारने ‘निपुण भारत अभियाना’द्वारे, २०२६-२७ पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यास इयत्ता तिसरी पर्यंत पायाभूत लेखन,वाचन व गणितीय कौशल्य विद्यार्थ्यांत रुजविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.ही उद्दिष्ट साध्य करण्या करीता विद्यार्थ्या सोबतच शिक्षकांचा सुद्धा कस लागणार आहे.

तर संघपाल मेश्राम केंद्र प्रमुख (वेळाहरी,हुडकेश्वर) यांनी विद्यार्थ्याला निपुण करण्या बाबाच्या उद्दिष्टाचे महत्व समजावून सांगितले.विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा स्पष्ट केला.शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून विद्यार्थ्यांची प्रगती कशी साधता येईल,स्विफ्ट चॅट अँप वर अध्ययन स्तर निश्चितीची माहिती भरणे,सखी सावित्री मंच,शालेय तक्रार पेटीचे,व्यवस्थापन व पोक्सो कायद्या अंतर्गत घ्यावयाच्या रजिस्टर वरील नोंदी इत्यादी बाबीचे मार्गदर्शन करण्यात आले.या परिषदेत केंद्र बुटीबोरी,वेळाहरी,हुडकेश्वर व विहीरगाव केंद्रातील खाजगी व अनुदानित शाळेतील सर्व
मुख्याध्यापक व शेकडो शिक्षक वर्ग उपस्थित होते.