कोचिंग क्लासेसच्या नावावर अवाढव्य शुल्क वसुली ?

नागपूरः विध्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व सराव तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्याच्या नावाखाली बुटीबोरी शहरात मोठ्या प्रमाणात अभ्यासिका आणि कोचिंग क्लासेस सुरू आहे. या कोचिंग क्लासेसचे संचालक विध्यार्थ्यांकडून अवाढव्य शुल्क वसुली करत असल्याने सर्वसामान्य पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत असल्याचे दिसून येते.

शहरातील एमआयडीसी रोडवरील कॉम्पलेक्स परिसर तर खासगी शिकवणीचे केंद्र बनले आहे. हे कोचिंग क्लासेस अभ्यासिका व मार्गदर्शन हा हेतू बाजूला सारून केवळ पैसे कमवण्याचे साधन बनले आहे. शालेय किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी तसेच युवा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी पैशाचा विचार न करता मार्गदर्शनचा शोध घेत असतो.

पाल्याच्या उज्वल भविष्याचा विचार करून पालक सुद्धा गाठीला असलेला पैसा पाल्याच्या कोचिंग क्लासेसवर खर्च करण्यास कुचराई करीत
नसल्यानेच कोचिंग कलासेसवाल्यांचे सुद्धा चांगलेच फावत आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विध्यार्थी भरकटल्यासारखे मिळेल त्या अभ्यासिकेत मार्गदर्शन प्राप्तीसाठी जातात, परंतु कोचिंग क्लासेसचे संचालक त्यांच्याकडून भरमसाठ वार्षिक शुल्क घेतात.

याशिवाय सैनिक भरती व अन्य स्पर्धा परीक्षांबाबतसुद्धा येथे मार्गदर्शन केले जाते. शहरात सर्वाधिक कोचिंग क्लासेस एमआयडीसी रोड परिसरात आहेत. या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने अवाढव्य शुल्क वसुली करण्याचा गोरखधंदा दिवसेंदिवस फोफावत आहे.

मुलींच्या सुरक्षेची हमी कोण घेणार?
अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सायंकाळी ७ तर कधी रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते. येथे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना राहत नाही. तेव्हा मुलींच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *