■ टाकळघाट ग्रामपंचायतमधील प्रकार ■ विकास कामांच्या प्रश्नांचा भडीमार
विविध मुद्यांवर गाजली ग्रामसभा

टाकळघाट टाकळघाट ग्रमपंचायतीची २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभागावाचा विकास, नगरपंचायत तसेच विविध प्रश्नांवरून चांगलीच गाजली.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे होत्या. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी राजू मुरले यांनी मागील इतिवृत व शासकीय परिपत्रकाचे वाचन केले. घरकुलांची माहिती, विकास कामांवर चर्चा आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावरून ग्रामसभेत ग्रामस्थांमध्ये वाद वाढल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. सचिव आणि सरपंच पक्षपात करतात. गुराच्या कोट्याचे निकष डावलून मर्जीतील लोकांनाच योजनेच्या लाभ देत असल्याचा आरोप सदस्य चंदू कावले यांनी केला. उल्लेखनीय म्हणजे नागरिकांचा गोंधळ उडाल्यामुळे महत्वाच्या विषयावर चर्चा होवू शकली नाही. ग्रामसभेला प्रतिष्ठीत नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रापं सदस्य, पदाधिकारी गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतचा मुद्दा गाजला
अध्यक्षांच्या परवानगीने हरिचंद अवचट यांनी ग्रामपंचायतचे नगर पंचायत करण्याचा मुद्दा मांडला. या मुद्यावर चर्चा सुरू असतांना नागरिकांमध्ये नगरपंचायत न करण्याबाबत रोष निर्माण झाला. ग्रामविकास अधिकारी राजू मुरले यांनी, २०२४ च्या शासन आदेश (जीआर) प्रमाणे पहिला मुद्दाः नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत / महानगरपालिका स्थापन करताना अथवा त्यांची हद्दवाढ होत असताना ज्या ग्रामपंचायत / ग्रामपंचायतीचे क्षेत्र समाविष्ट होते. केवळ त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या १ वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत बदल करता येईल. दुसरा मुद्दाः शासन आदेश (जीआर) २०२४ मधील निकष कायम राहतील. ग्रामपंचायत स्थापनेपासून किंवा ग्राम पंचायत निवडणूक होऊन २ वर्षा पर्यंत ग्रामपंचायतचे विभाजन किंवा एकत्रीकरण करू नये, असे २०२४ च्या शासकी आदेशात स्पष्ट केले असल्याचे सांगून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले जाईल व शासन निर्देशाप्रमाणे पुढील कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.