हॉटेल मालक फरार : पीडित महिलेची सुटका
बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीतील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्रमांक पीएपी १३१ व १३२ वर असलेल्या हॉटेल ७/१२ इनमधील देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला, कारवाईत पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली असून, कारवाईदरम्यान हॉटेल मालक फरार झाला आहे. सुमित वेणीशंकर भूरिया (३८, रा. तकिया वॉर्ड, छपरा, ता. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह. मु. टाकळघाट), असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल मॅनेजरचे नाव आहे, तर गणेश लक्ष्मण वैद्य (रा. प्रभाग क्र. ७, बुटीबोरी), असे फरार झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून बुटीबोरीच्या टाकळघाट शिवारातील एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. तेथे खोली क्रमांक १०२ मध्ये हॉटेल मालक गणेश वैद्य व व मॅनेजर सुमित भूरिया यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे आढळले. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून हॉटेल मालक गणेश वैद्य, मॅनेजर सुमित भूरिया विरुद्ध कलम १४३ (१) (फ), १४३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम ३.४.५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९७६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मैनेजर सुमित भुरियाला अटक केली असून, हॉटेल मालक गणेश वैद्य फरार झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, निरीक्षक सतीशसिंग राजपूत, उपनिरीक्षक ओलना गिरी, हवालदार राजेंद्र तायडे, संतोष तिवारी, श्रीकांत गौरकर, विनायक सातव, तपस्या शेटे, मेधा बोरकर, पोलिस उपविभागीय कार्यालयातील अंमलदार किशोर सरमाके, प्रवीण खोडे, रोशन बावणे, बुटीबोरी ठाण्याचे अरुण कावळे व रमेश नागरे यांनी केली.