■ एकाच दिवशी चार ठिकाणी पोलिसांची धाड आरोपींवर गुन्हा दाखल, सूचनापत्रावर सोडले
बुटीबोरी : बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त ठाणेदार प्रतापराव भोसले यांनी परिसरातील अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. एका दिवसात चार ठिकाणी कारवाई करून चारही आरोपींकडून मुद्देमाल जम केला.
ठाणेदार भोसले यांना रुइंखैरी, सातगाव येथे अवैध दारूविक्री, बुटीबोरीत सट्टा चालविणारे सक्रिय असल्याचे कळले. त्यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे, हवालदार प्रवीण देव्हारे, युनूस खान, अरुण कावळे, गौरव मोकळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी रुईखैरी येथे जलसा ढाब्याच्या बाजूला रुईखैरी शिवारात पुरुषोत्तम गन्नू दसरिया (५५, रा. कावराभान, जि. गोंदिया, ह.मु. रुईखैरी) हा दारूविक्री करताना आढळला. पंचासमक्ष त्याच्या ताव्यातून देशी दारूच्या ७० निपा जप्त केल्या. दुसरी कारवाई सातगाव रिधोरा येथे करण्यात आली. आरोपी कृष्णा मारुती पारसे (३९, रा. सातगाव रिधोरा) याला घरीच मोहफुलाची दारूविक्री करताना ताब्यात घेतले. स्वयंपाकघरातून २० लीटर मोहफुलाची दारू जप्त केली. उर्वरित साहित्य पंचासमक्ष नष्ट केले.
तिसरी कारवाई सातगाव येथे ज्ञानदीप शाळेजवळ करण्यात आली. आरोपी गोविंदा चंद्रभान पारसे (२६, रा. किन्हाळा सातगाव) याच्या ताब्यातून २० लीटर मोहफुलाची दारू जप्त केली. चौथी कारवाई बुटीबोरी एमआयडीसी चौकात करण्यात आली. पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमआयडीसी चौकात आरोपी कुणाल बाबूराव वाघमारे (२४, रा. सोनेगाव, ता. चिमूर, जि. चंद्रपुर, ह.मु. फ्लॅट क्रमांक ११, सिडको कॉलनी, बुटीबोरी) हा सट्टापट्टी लिहिताना आढळला. त्याच्या ताब्यातून एकूण एक ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस शिपाई गौरव मोकळे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून सूचनापत्रावर सोडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संजय खंडारे, हवालदार प्रवीण देव्हारे, युनूस खान, अरुण कावळे, गौरव मोकळे यांनी केली.