कंपनीतून लोखंडी प्लेट चोरणाऱ्याला अटक
बुटीबोरी, वार्ताहर. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री बुटीबोरी एमआयडीसी परिसरात गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईत लोखंडी प्लेट चोरून नेणाऱ्यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 28 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हैदर अली शहशाद अली (33) रा. मुंगरी गलियाबाद, ता. करछना, जिल्हा. प्रयागराज उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील बंद असलेल्या कंपन्यांच्या आवारातून लोखंडी प्लेट व इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे या भागातील गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली होती.
एलसीबीचे पथक बुधवारी रात्री या भागात गस्तीवर असताना त्यांना एमएच 31 सीक्यू 9619 क्रमांकाचा ट्रक रोडने जाताना आढळून आला. संशय आल्याने त्यांनी हा ट्रक अडवून झडती घेतली. त्यांना ट्रकमध्ये लोखंडी प्लेट आणि अँगल आढळून आले. चौकशीदरम्यान ते साहित्य चोरून आणल्याचे स्पष्ट होताच त्यांनी हैदर अली शहशाद अली यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 15 लाख रुपयांचा ट्रक, 22 हजार रुपयांच्या लोखंडी प्लेट, 3,750 रुपये रोख असा एकूण 15 लाख 28 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, त्याच्याकडून लोखंड चोरीच्या इतर घटना उघड होण्याची शक्यताही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, हवालदार मिलिंद नांदूरकर, महेश जाधव, मयुर ढेकळे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, सतीश राठोड यांच्या पथकाने केली