बुटीबोरी, वार्ताहर. स्वयंपाकाचे कारणावरून पत्नीसोबत झालेल्या शुल्लक भांडणावरून इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा ब्राम्हण येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
नितेश पुरुषोत्तम अग्रवाल ( 36 ) रा. सिदोरा, ता.तुमसर जिल्हा भंडारा हमू ब्राम्हणी ता.जिल्हा नागपूर असे घटनेतील मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक नितेश हा स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनी मध्ये सेक्युरिटी गार्ड चे काम करत होता.
त्याला आई, एक मोठा भाऊ, पत्नी आणि दोन लहान मूले असा परिवार असून ते गेली जवळजवळ सहा ते सात वर्षांपासून ब्राम्हणी येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्याला दारूचे व्यसन होते, अशी माहिती असून यातून त्याचे नेहमीच पत्नीसोबत भांडण व्हायचे. घटनादिनी सकाळी त्याचे स्वयंपाकाचे कारणावरून शुल्लक भांडण झाले. यातून त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिस ठाण्यातील पीएसआय संजय खंडारे, पोह अरविंद चौहान तसेच पोशि माधव गुट्टे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता रवाना करून घटनेची नोंद करण्यात आली. पूढील तपास माधव गुट्टे करीत आहेत.