आ. सुनील केदार यांनी शब्द पाळला !

टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका १२ वर्षे जुनी असल्याने व तिच्यात वारंवार बिघाड येत असल्याने येथे नवीन रुग्णवाहीकेची गरज होती. हीच बाब हेरून टाकळघाट ग्रामपंचायतच्या सरपंचा शारदा शिंगारे यांनी माजी मंत्री व विद्यमान आमदार सुनील केदार हे येथील एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता एका रुग्णवाहीकेची मागणी केली होती.

त्यावेळी आ. केदार यांनी रुग्णवाहीका देण्याचे वचन दिले होते. त्याच वचनाची पूर्तता करीत आ. केदार यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या १५ वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहीका मंजूर करून काल दि. ४ सप्टेंबरला टाकळघाटच्या सरपंचा शारदा शिंगारे व वैद्यकीय अधिकारी सौख्या टापरे यांना रुग्णवाहीका हस्तांतरीत केली. विशेष बाब अशी की, टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्र हे नागपूर जिल्ह्यात सर्वांत जास्त बाह्यरुग्ण विभाग असलेले रुग्णालय आहे. येथे २५० ते ३०० रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागात दररोज तपासणीकरीता येत असतात. त्यातच येथे लसीकरण स्तनदा माता व बाळंतपण सुद्धा केले जाते त्यातल्या त्यात येथून बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र हाकेच्या अंतरावर असल्याने औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार ही येथे उपचारकरिता येत असतात.

अनेकदा रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याने किंवा तिच्यात तांत्रिक बिगाड असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सोसावालागत असे तर एनवेळी जास्तीचे पैसे मोजून खाजगी वाहनात रुग्णाला नागपूरला न्यावे लागत असल्याचे अनेक उदाहरणे सरपंचा शारदा शिंगारे यांचेकडे येत होती. रुग्णांची होत असलेली गैरसोय व नातेवाईकांचा मनस्ताप पाहता सरपंचा शिंगारे यांनी आ. सुनील केदार यांचेकडे रुग्णवाहिकेकरीता वारंवार तगादा लावत होता. दरम्यान आ. केदार यांनी जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकर्डे यांच्याशी बोलून १५ वित्त आयोगातून रुग्णवाहीका मंजूर करवून घेत आपली वचनपूर्ती केली. दरम्यान रुग्णवाहिका हस्तांतरणप्रसंगी आ सुनील केदार यांच्यासह जि.प अध्यक्षा मुक्ताताई कोकडे, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, हिंगणा पं.स समापती सुषमाताई कडू (कावळे), सरपंचा शारदा शिंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौख्याताई टापरे, नाना शिंगारे, सूरज वासाड, जिल्हा परिषद येथील पदाधिकारी, अधिकारी उपस्थितीत होते. आ केदार यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे त्यांचे येथील जनतेच्या वतीने चंद्रभान इरपाते, रामदास पुंड, नेमचंद डायरे, विजय खंगार, पंजाब भुजाडे, योगेश कोटेकर आदीनी आभार व्यक्त केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *