बुटीबोरी : एकीकडे शहर विकासाच्या नावावर कात टाकत आहे. तर दुसरीकडे या शहरात प्रवेश करताच जीवघेण्या खड्डयाने स्वागत होते. हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी होत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे बुटीबोरी शहराला औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जाते. याठिकाणी दिवसभर हजारो नागरिकांची वर्दळ असते. बुटीबोरी शहरात प्रवेश म्हणून एकमेव रस्त्याचे काही वर्षांपूर्वी सिमेंटीकरण झाले. यात कोट्यवधी रुपयांचा निधीसुद्धा खर्च झाला आहे.

तर काही दिवसांपासून या मुख्य प्रवेश रस्त्यावर मधोमध जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्यांकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या खड्डयांत पावसाचे पाणी साचून हे खड्डे दिसेनासे होते.

त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्डयांची तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी जोर धरत आहे