कामबंद आंदोलनाला सुरुवात : आंदोलनस्थळी तणाव
बुटीबोरी मासिक वेतन, दिवाळीचा बोनस, ले ऑफचे वेतन यासह इतर मागण्यांसाठी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील मोरारजी टेक्सटाईल कंपनीतील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात सोमवारी (दि. ८) पाण्याच्या टाकीवर चढून गिरी करीत कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करीत महिला कामगारांना मारहाण आरोपही कामगारांनी केला.
कंपनी व्यवस्थापनाने दोन हजार स्थायी व अस्थायी कामगारांना त्यांचा तीन महिन्यांचा पगार, दिवाळीचा बोनस, ले ऑफचे वेतन तसेच महिन्यातील २६ दिवस काम दिले नाही. व्यवस्थापन मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कामगारांनी केला असून, या विरोधात तसेच प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कामबंद आंदोलन करीत असल्याचे कामगारांनी सांगितले.
कामगारांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी करीत आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाची तीव्रता व कामगारांचा रोष विचारात घेता पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आ. समीर मेघे यांनी कामगारांची भेट घेत यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी चर्चा करण्याची तसेच चर्चेत कामगारांचे पाच प्रतिनिधी राहणार. असल्याची ग्वाही दिली. यावेळी तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे उपस्थित होते. शिवाय, नागपूर (ग्रामीण) मुख्यालयासह उमरेड, बुटीबोरी, कळमेश्वर पोलिस ठाण्यातून कुमक मागविण्यात आली होती
पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकारी जखमी
काही कामगारांनी विष प्राशन आंदोलन सुरू केले आणि पोलिसांनी ते हाणून पाडले. त्यामुळे परिस्थिती चिघळत गेली. पोलिसांनी महिला कामगारांना मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला. त्यातच कामगारांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. दगड लागल्याने ठाणेदार महादेव आचरेकर आणि पोलिस उपनिरीक्षक पालीवाल जखमी झाले