
बुटीबोरी/बेला कापसाला अधिक भाव देण्याचे आमिष दाखवून वर्धा जिल्ह्यातील बोगस दलालाने बेला परिसरातील १२ शेतकऱ्यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बेला पोलिसांनी २१ एप्रिलला तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दोनतीन वर्षांपासून घटनेतील संशयित आरोपी अतुल पिसे (३४, रा. डोंगरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) आणि सहआरोपी शुभम शांताराम काटवले (२५, रा. नांद, ता. उमरेड, जि. नागपूर), दीपक शालिक चंदनखेडे (२०, रा. डोंगरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) हे बेला परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कापसाला शासकीय भावापेक्षा अधिक भाव देण्याची हमी देत कापूस खरेदी करीत होते. त्यांनी काही शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून इतर शेतकऱ्यांना जाळ्यात ओढले.

यातूनच त्यांनी या वर्षी बेला परिसरातील १२ ते १३ शेतकऱ्यांकडून कापसाला अधिक भाव देण्याचे आमिष दाखवून १४ लाख रुपयांचा कापूस खरेदी केला. त्या कापसाची हिंगणघाट येथील माँ भवानी जिनिंग, बालाजी जिनिंग, जी. आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा दाखवून विक्री केली. विक्री केलेल्या कापसाची रक्कम जिनिंगधारकाकडून स्वतःकडे वळती करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. बोगस दलालांच्या गोरखधंद्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित शेतकऱ्यांनी बेला पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात एपीआय अजित कदम यांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपींनी अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांनी गंडविल्याची दाट शंका आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास अनेक शेतकरी पोलीस ठाण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेतकऱ्यांच्या फसवणुकीमध्ये अनेकांचा सहभाग असण्याची शंका असल्याने ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनात सतेंद्र रंगारी, सुरेंद्र ठाकरे, अमित पवार यांचे विशेष पथक अधिक तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांनो, सावधगिरी बाळगा
एकीकडे निसर्गाच्या कोप, उपासमारी व कर्जबाजारीपणामुळे बळीराजा आत्महत्या करीत आहे. कसेबसे हाती आलेले पीक विकण्याकरिता गेले तर दलाल व खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केले जाते. याचा प्रत्यय बेला परिसरातील या प्रकरणावरून आला आहे. या प्रकरणातील आरोपींकडे परवाना नाही. त्यामुळे अशा बोगस दलालांना कापूस खरेदीची रक्कम कशी दिली जाते, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. विक्रीकरिता हजर असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन त्यांच्या उत्पन्नाची रक्कम दलालांच्या घशात कशी काय जाऊ शकते? याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हा प्रकार लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. अशा प्रकरणात कुणाकुणाचा हात आहे, हे तपासाअंती कळणार आहे.
१२ शेतकऱ्यांची १४ लाखांनी फसवणूक