आठवडी बाजारातील वजनकाट्यात गोलमाल

ग्राहकांची होते फसवणूक, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

टाकळघाट: येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडून वजनाची हेराफेरी करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे चित्र उघडकीस येत आहे. ग्राहकांची सर्रासपणे लूट होत असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही.

भाजीपाला विक्रेते व अन्य दुकानदार यांच्याकडे असलेल्या इलेक्ट्रिक वजनकाट्यामध्ये वजनमापात ‘सेटिंग’ असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला.
आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत याठिकाणी वसली आहे. त्यामुळे सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील, कंपनीतील मजूरवर्ग आपला आठवडी बाजार करण्यासाठी येतो. परंतु भाजीपाला विक्रेते व अन्य दुकानदार यांच्याकडून वजनात काटा मारणे, हेराफेरी, प्रमाणित वजन न वापरणे, असे प्रकार नित्याचेच असल्याने किलोची घेतलेली भाजी तीन पावच मिळत असल्याची ओरड आहे.

परंतु सर्वसामान्य व्यक्ती कोणाकडे दाद मागणार? त्याच्या ओरडण्याकडे कोण लक्ष देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.येथील आठवडी बाजार शनिवारी भरत असतो. हजारोंच्या संख्येने ग्राहक भाजीपाला, किराणा व अन्य साहित्य खरेदी करतात. परंतु ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना येथे नाही. एकही वजनकाटा मान्यताप्राप्त दिसून येत नाही. ग्राहकाने दुकानदाराकडून घेतलेली वस्तू वजनात कमी आल्यास ग्राहक व दुकानदार यांच्यात हमरीतुमरीची वेळ येते.

यासंदर्भात प्रशासनाकडे कोणी तक्रार केल्यास थातुरमातुर कारवाई केली जाते. असाच प्रकार येथील सुज्ञ ग्राहकांसोबत घडल्याने यासंबंधित प्रकाराबाबत येथील ग्रामपंचायतीकडे वजनमाप तपासण्याची तक्रार सुरेश इखार, रामकृष्ण शेंडे, विलास डायरे, शरद बालवीर, दिनेश कावळे, मिलिंद खडतकर आदींनी केली.

ग्रामपंचायतने घेतली तक्रारीची दखल

येथील काही सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारात ग्राहकांच्या होत असलेल्या फसवणुकीची सरपंच शारदा शिंगारे यांनी दखल घेत ग्रामपंचायतीतर्फे दवंडीच्या माध्यमातून सर्व भाजीपाला विक्रेते व अन्य दुकानदार यांना सूचना देऊनसुद्धा वजनकाट्यामध्ये घोळ सुरु राहिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *